जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांमधील देवदुताचे दर्शन 66 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाच्या मुलाची प्रतिक्रिया

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) – ऑक्सिजनची पातळी 68 पर्यंत कमी झालेली. धाप लागलेली अशा परिस्थितीत आम्ही वडिलांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. वडिलांच्या उपचाराच्या काळात आम्हाला जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांमधील देवदुताचे दर्शन झाले, अशी भावना तेंडोली, ता. कुडाळ येथील 66 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाच्या मुलांनी आज व्यक्त केली. तेंडोली येथील प्रसिद्ध दशावतारी कलाकार. त्यांना प्रथम कफ, खोकला याचा प्रथम त्रास सुरू झाला. डॉक्टरांना दाखवले. पण, फरक पडला नाही. त्यातच धाप लागली. त्यामुळे खासगी डॉक्टरनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या ऑक्सिजनची पातळी 68 पर्यंत खाली आली होती. प्रकृती गंभीर होती. पण, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि सर्वच कर्मचाऱ्यांनी केलेल्या योग्य उपचारांमुळे त्यांचे प्राण वाचले आणि आपल्या मुला - नातवंडामध्ये ते परत आले. जिल्हा रुग्णालयामध्ये वडील दाखल असतानाचा अनुभव सांगताना त्यांचा मुलगा म्हणाला, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केले त्यावेळी ऑक्सिजनची पातळी खूपच खाली होती. धाप लागत होती. त्यामुळे सुरुवातीस त्यांना ऑक्सिजनच्या आधारावर ठेवले. पण, दोन दिवसात प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. 15 ते 16 दिवस त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. या संपूर्ण काळात आम्ही फारच घाबरून गेलो होतो. आमचे वडील पुन्हा परत घरी येतील की नाही ही शंका नेहमीच मनात येत होती. पण, तेथील डॉक्टर रोज रुग्णांची तपासणी करण्यासाठी येत त्यावेळी आम्हाला दिलासा देत होते. तुमचा रुग्ण लवकरच बरा होईल काही काळजी करू नका असा धीर देत होते. सुरू असलेल्या उपचारांची नियमितपणे माहिती दिली जात होती. आवश्यक ते सर्व उपचार केले जात होते. त्यांच्या प्लेटलेट्स कमी झाल्यावर प्लेटलेट्स चढविण्यात आल्या. रक्ताची रोजच्या रोज तपासणी केली जात होती. त्यानुसार योग्य ते उपचार केले जात होते. त्याशिवाय डॉक्टर रोजच्या रोज व्यायाम करण्यास सांगत असतं. तो व्यायाम रुग्णांकडून करुनही घेतला जात होता. श्वसनासंबंधीचे हे व्यायाम असत. रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि सर्व कर्मचारी यांचे चांगले सहकार्य आम्हाला मिळाले. त्यांच्या या प्रयत्नामुळेच आज माझे वडील बरे होऊन घरी आले आहेत. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'