जिल्ह्यातील डॉक्टर करत असलेली रुग्ण सेवा पाहता कोरोना हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही 55 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाची प्रतिक्रिया

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.) – जिल्ह्यातील डॉक्टर्स रुग्णांची सुंदर सुश्रुशा करत आहेत. आमच्यावर योग्य उपचार होत आहेत. डॉक्टर्स करत असलेली सेवा पाहता जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही अशी भावना व्यक्त केली आहे, कुडाळ तालुक्यातील सरंबळ येतील 55 वर्षीय कोरोना मुक्त रुग्णाने. एचआरसीटी स्कोअर 14, ऑक्सिजनची पातळी 89 पर्यंत खाली अलेली अशा परिस्थितीमध्ये त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती पाहता त्यांना तातडीने दाखल करून घेण्यात आले. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यात येत होती. रक्तदाबावर नियमितपणे लक्ष दिले जात होते. 15 दिवस त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. या काळात त्यांना नियमितपणे औषधे व जेवण दिले जात होते. 15 दिवसांच्या आपल्या रुग्णालयातील अनुभवाविषयी बोलताना ते म्हणाले, जिल्हा रुग्णालयामध्ये आम्हाला सर्व प्रकारची सेवा, सोयी - सुविधा तर मिळाल्याच सोबतच आम्हाला डॉक्टरांमधील देवाचेही दर्शन झाले. देवा सारखे येथील डॉक्टर धावून आल्यामुळे आज मी ठणठणीत बरा होऊन घरी परतलो आहे. दोन वेळा चांगले जेवण दिले जात होते. अंडी, काढा आणि फळेही दिली जात होती. महत्वाचे म्हणजे ज्या ज्या वेळी आम्हाला डॉक्टरांची गरज पडत असे त्या त्या वेळी डॉक्टर्स आमच्यासाठी वॉर्डमध्ये येत असत. आल्यानंतर फक्त एकाच रुग्णाला पाहून परत न जाता वॉर्डमधील सर्वच रुग्णांची विचारपूस करून मगच डॉक्टर परतत होते. आमच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी, आमचे मनोबल वाढवण्यासाठी डॉक्टर्स, नर्स सतत प्रयत्नशील असत. ते देत असलेल्या दिलास्यामुळे रुग्ण 50 टक्के बरा होत असे. तेथील नर्सही उत्तम सेवा देत होत्या. वेळेवर औषध दिली जात होती. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने नियमितपणे रक्तदाब तपासला जात होता. या 15 दिवसांमध्ये आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवली नाही. घरच्या सारखे वातावरण होते. डॉक्टरांनी केलेल्या उपचार आणि सुश्रुसेमुळेच आज ठणठणीत बरा होऊन घरी परतलो आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'