कुडाळ नगरपंचायतीतर्फे गणेश घाटावर आभार आणि संकल्पाची रांगोळी 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते स्वच्छता व वृक्षारोपणाचा संदेश

सिंधुदुर्ग, दि.१८ : शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि शहर सुंदर व आरोग्यदायी बनवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या देशव्यापी 'सेवा संकल्प अभियाना'चा भाग म्हणून कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन (दि.१७ रोजी) करण्यात आले. येथील प्रसिद्ध गणेश घाटावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकाभिमुख कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नागरिकांना विहित मुदतीत शासकीय व नागरी सेवा पारदर्शकपणे मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडून हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत केवळ कागदोपत्री कामे न करता प्रत्यक्ष जनतेच्या सहभागातून परिसर स्वच्छता, आरोग्य जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरी समस्यांचे जलद निवारण आणि सार्वजनिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानाचे औचित्य साधून गणेश घाटावर एकत्र आलेल्या सर्व घटकांनी एकजुटीचे दर्शन घडवत भव्य मानवी साखळी तयार केली. राष्ट्रीय एकात्मता आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जमिनीवर अत्यंत कलात्मकतेने भारताच्या नकाशाची भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचा भाग म्हणून गणेश घाट आणि लगतच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नगरपंचायतीचे कर्मचारी आणि नागरिकांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण परिसर कचरामुक्त व चकाचक केला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते घाट परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व नागरिक व कर्मचाऱ्यांना आपला परिसर, गल्ली आणि शहर कायम स्वच्छ ठेवण्याची 'स्वच्छतेची शपथ' देण्यात आली. या कार्यक्रमाला कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, मुख्याधिकारी खंडू पवळ, नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता दूत आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'