सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन
सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : ग्रामीण भागातील स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत आहे. ‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित हे अभियान लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी केले आहे.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. अभियानांतर्गत गावांमधील दुर्लक्षित तसेच कचरा साचणाऱ्या सार्वजनिक ठिकाणांची ओळख करून त्यांचे जिओ-टॅगिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित ठिकाणांची स्वच्छता करून आवश्यकतेनुसार सुशोभीकरण करण्यात येणार आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता ज्ञानयात्रा, स्वच्छता संवाद तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच RRR (Reduce, Reuse, Recycle) या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवून कचरा कमी करणे, पुनर्वापर व पुनर्चक्रणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
दि. ३० सप्टेंबर रोजी ‘सफाईमित्र सुरक्षा व सन्मान शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये सफाईमित्रांची आरोग्य तपासणी, सुरक्षा साहित्याचे वाटप तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ या उपक्रमांतर्गत व्यापक श्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवसानिमित्त ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. या ग्रामसभांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत आवश्यक ठराव करण्यात येणार आहेत. तसेच ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
कचऱ्यापासून उपयुक्त तसेच कलात्मक वस्तू तयार करण्यासाठी ‘Waste to Wealth’ व ‘Waste to Art’ या उपक्रमांनाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वच्छतेसाठी श्रमदान करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी केले आहे.
०००००००
Comments
Post a Comment