शेतकरी बांधवांनी कृषीविषयक महत्त्वाच्या बाबी पूर्ण करुन घ्याव्यात फार्मर आयडी, पीएम-किसान ई-केवायसी, ई-पिक पाहणी व ‘महाविस्तार-AI’चा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : गणेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी तसेच स्थानिक शेतकरी बांधव गावी दाखल झाले आहेत. गावी आलेल्या शेतकरी बांधवांनी या कालावधीचा उपयोग करून शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या फार्मर आयडी, पीएम-किसान ई-केवायसी, लँड सीडिंग, आधार सीडिंग, ई-पिक पाहणी तसेच ‘महाविस्तार-AI’ ॲपचा वापर यासंबंधीची कार्यवाही तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागच्या वतीने करण्यात आले आहे.
विविध योजनांसाठी फार्मर आयडी आवश्यक
शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी AgriStack अंतर्गत फार्मर आयडी महत्त्वाचा आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, महाडीबीटी पोर्टलवरील विविध योजना, पीक विमा, पीक कर्ज, शासकीय भात खरेदी, ऑनलाइन खत खरेदी आदी सुविधांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नजीकच्या CSC (ग्राहक सेवा केंद्र) येथे जाऊन किंवा स्वतःच्या मोबाईलद्वारे तातडीने फार्मर आयडी काढून घ्यावा.
पीएम-किसानचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करा
पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता विनाखंड मिळण्यासाठी e-KYC, लँड सीडिंग (Land Seeding) आणि Aadhaar Seeding या प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी गावी असताना संबंधित प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी.
महाडीबीटीवर विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज
शेतीसाठी आवश्यक यंत्रे व अवजारे, ठिबक सिंचन, फळबाग लागवड यांसह विविध योजनांच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतो. पात्र शेतकऱ्यांनी संबंधित योजनांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावेत.
ई-पिक पाहणीची नोंदणी तातडीने करा
पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई, शासकीय भात खरेदी तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पीक पाहणीची नोंद महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी आपल्या भात, नाचणी व इतर खरीप पिकांची तसेच फळपिकांची नोंद ‘DCS MH’ ॲपद्वारे तातडीने करून घ्यावी.
‘महाविस्तार-AI’ ॲपचा वापर करा
शेतकऱ्यांना शेतीविषयक अद्ययावत माहिती, हवामान, पीक व्यवस्थापन आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यासाठी ‘MahaVistar-AI’ ॲप उपयुक्त आहे. शेतकऱ्यांनी हे ॲप Google Play Store वरून डाउनलोड करून त्याचा वापर करावा.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी आलेल्या चाकरमानी तसेच स्थानिक शेतकरी बांधवांनी या कालावधीत वरील सर्व महत्त्वाच्या बाबी पूर्ण करून घेऊन शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
००००००
Comments
Post a Comment