सिंधुदुर्गात भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा

सिंधुदुर्ग, दि. 2 (जिमाका) : इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या वतीने ‘भटके-विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय, समान संधी आणि सन्मान या बाबींवर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास कणकवली कॉलेजचे प्रा. हरिभाऊ भिसे, ॲड. स्वाती तेली तसेच भटके-विमुक्त समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अशोक खरात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी स्वप्निल कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांसमवेत दीपप्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. उपस्थित मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्त्यांनी भटके-विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता व्यक्त केली. भटके-विमुक्त समाजाकडे सहानुभूतीच्या भावनेतून नव्हे, तर समानता व सन्मानाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच प्रत्येक कुटुंबाला सन्मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देणे. भटके-विमुक्त समाजाचा विकास हा केवळ एका समाजाच्या विकासापुरता मर्यादित नसून, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी निगडित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सामाजिक न्याय, समान संधी, शिक्षण, रोजगार आणि सन्मान या आधारस्तंभांवर भटके-विमुक्त समाजाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. आश्रमशाळा, बोर्डवे, कणकवली येथील विद्यार्थ्यांनी विविध नृत्यकला सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी स्वप्निल कांबळे यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व उपस्थितांचे आभार मानले. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'