नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवरच तातडीने निराकरण करा - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्ग, दि. 7 (जिमाका) : नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक व क्षेत्रीय स्तरावरच जलद, प्रभावी आणि कायदेशीर पद्धतीने निराकरण व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख व कार्यालयप्रमुखांनी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व विभागांना लेखी दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख व कार्यालयप्रमुखांना सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी 3 ते 5 या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून नागरिक व अभ्यागतांच्या भेटी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या वेळेत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांचे कायदेशीर व नियमानुसार निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. नागरिकांना कार्यालयप्रमुखांची भेट घेण्याची वेळ सहजपणे समजावी यासाठी सर्व विभागप्रमुख व कार्यालयप्रमुखांनी त्यांच्या दालनाबाहेर किंवा कार्यालयाच्या दर्शनी भागात अभ्यागतांनी भेटण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार, दुपारी 3 ते 5 असा स्पष्ट व दर्शनी फलक तातडीने लावावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारी मंत्रालयीन किंवा जिल्हास्तरावर जाण्यापूर्वीच संबंधित तालुका अथवा क्षेत्रीय स्तरावर प्राधान्याने निकाली काढण्यात याव्यात, यासाठी संबंधित यंत्रणांनी कार्यक्षम तक्रारनिवारण यंत्रणा राबवावी. सर्व कार्यालयप्रमुखांनी आपल्या अधिनस्त उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालये, उप-कार्यालये, शाखा तसेच सहाय्यक कार्यालयांना याबाबत तातडीने लेखी सूचना निर्गमित कराव्यात. तसेच संबंधित कार्यालयांमध्येही नागरिकांना भेटण्याच्या वेळेची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे, याची दक्षता घ्यावी. महसूल मंत्री शासकीय कार्यालयांना अचानक भेट देऊन या सूचनांची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याची तपासणी करणार असल्याचे आढावा बैठकीत कळविण्यात आले आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या आदेशाची गंभीरतेने व कठोरपणे अंमलबजावणी करावी. आदेशाचे पालन न झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी वैयक्तिकरित्या जबाबदार राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'