‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ अंतर्गत जिल्ह्यात सामुदायिक आरोग्य शिबिरे दि. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान आयोजन; नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. ११ (जिमाका) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ या आरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध ठिकाणी सामुदायिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या आरोग्य शिबिरांचे आयोजन मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत रुग्णालये तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणारी प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणीही आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, विविध रक्तचाचण्या तसेच आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून संभाव्य आजारांचे वेळेत निदान व आवश्यक उपचार करून घेण्यासाठी या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा. आरोग्य तपासणीदरम्यान एखाद्या आजाराचे निदान झाल्यास संबंधित पात्र रुग्णांना पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तसेच इतर उपलब्ध शासकीय आरोग्य योजनांमधून, संबंधित योजनेच्या निकषांनुसार आवश्यक मदत मिळवून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्राथमिक तपासणीपासून पुढील उपचारापर्यंत गरजू व पात्र रुग्णांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे, आजारांचे प्राथमिक स्तरावर निदान करणे तसेच गरजू व पात्र रुग्णांना पुढील उपचारासाठी उपलब्ध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देणे, हा आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सामुदायिक आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी होऊन ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या आरोग्य मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'