कलमठ येथे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ ई-कचरा व्यवस्थापन व ‘९ संकल्प थीम’वर ग्रामपंचायतीने काम करावे – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर
सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा संकल्प अभियान २०२६’ चा जिल्हास्तरीय शुभारंभ आज ग्रामपंचायत कलमठ येथे झाला. दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना विविध शासकीय सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासोबतच ई-कचरा व्यवस्थापन, शाश्वत विकास आणि लोकसहभागावर आधारित उपक्रम राबविण्यात यावेत, असे मार्गदर्शन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामपंचायत कलमठच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कलमठ गावाच्या सर्वांगीण विकासाची तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची माहिती देणारी चित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले. ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी योजना, शासनाच्या विविध अभियानांमध्ये गावाचा सहभाग तसेच विविध उपक्रमांमधून ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले पुरस्कार व सन्मान याबाबत त्यांनी माहिती दिली.
कणकवलीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी ‘सेवा संकल्प अभियान’चा उद्देश आणि अभियानाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी ग्रामपंचायत स्तरावर पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनाचे महत्त्व अधोरेखित केले. अभियानातील उद्दिष्टे प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नागरिकांना प्रशासकीय सेवा विनाविलंब उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अभियानाच्या पहिल्याच दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात १० लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांचे वितरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कणकवली पंचायत समितीच्या सभापतींनी आपल्या मनोगतात ग्रामपंचायत कलमठच्या विकासाभिमुख कार्याचे कौतुक करून अभियानास शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी ग्रामपंचायत कलमठ, सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. कलमठ ग्रामपंचायतीने आगामी काळातही विकासाच्या विविध क्षेत्रांत अग्रेसर राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ग्रामपंचायतीने विशेषतः ई-कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाच्या ‘नऊ संकल्प थीम’ (Themes of Localization of SDGs) वर अधिक प्रभावीपणे काम करावे. या माध्यमातून गावातील विकासकामांना लोकसहभागाची जोड देऊन शाश्वत व सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
मुख्य कार्यक्रमानंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या ग्रामपंचायत कलमठच्या ‘निर्माल्य कलश रथा’चा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गणेशोत्सव काळात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे योग्य संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानंतर ग्रामपंचायत प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कलमठ ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकीतून भूमिहीन कुटुंबांना जागा उपलब्ध करून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या गृहसंकुलाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमास कणकवली तालुका उपसभापती राजेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. वालावलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. काळगे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर. एल. शिंदे व पी. जी. कदम, कलमठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी श्री. दत्तात्रय तळवडेकर यांनी केले.
०००००००






Comments
Post a Comment