प्रलंबित महसुली दावे व अपील प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत’चे आयोजन
सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली महसुली दावे व अपील प्रकरणे परस्पर संमतीने तडजोडीच्या माध्यमातून जलदगतीने निकाली काढण्यासाठी जिल्ह्यात ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १२ वाजता महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. परस्पर संमतीने तडजोड करण्यास तयार असलेल्या पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अनुप जावळे यांनी केले आहे.
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या अधिनस्त उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये जमीन मोजणी प्रकरणे, फेरफार नोंदी, एकत्रीकरण योजनेतील चूक दुरुस्तीची प्रकरणे तसेच कार्यालयीन इतर तक्रारींबाबत कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध अथवा केलेल्या कार्यवाहीविरुद्ध अपील प्रकरणे दाखल होत असतात. या प्रकरणांमध्ये सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून निर्णय होईपर्यंत पक्षकारांचा वेळ, पैसा व श्रम खर्ची पडतात. तसेच न्याय मिळण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन प्रलंबित अपील प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी महसूल लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.
या लोकअदालतीच्या माध्यमातून दोन्ही पक्षकार परस्पर संमतीने समझोता अथवा तडजोड करण्यास तयार असल्यास त्यांचे प्रकरण विनाविलंब निकाली काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी पक्षकारांनी स्वयंप्रेरणेने अथवा विधिज्ञामार्फत तडजोडीस तयार असल्याबाबतचा लेखी अर्ज जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे सादर करावा.
ज्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकार तडजोडीस तयार आहेत, त्यांनी संबंधित प्रकरणातील ‘प्रपत्र अ’मधील नमुन्यानुसार तडजोडीसाठी अर्ज सादर करावा. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर दोन्ही पक्षकारांची तडजोडीसाठी संमती निश्चित करण्यात येईल. त्यानंतर नियमानुसार तडजोडनामा तयार करून महसूल लोकअदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या संमतीने अंतिम आदेश पारित करण्यात येणार आहे.
महसूल लोक अदालतीमुळे प्रलंबित प्रकरणांमध्ये तोंडी युक्तिवाद, उलट तपासणी आणि दीर्घ सुनावणी यांसारख्या प्रक्रियांना पर्याय उपलब्ध होऊन प्रकरणांचा जलद निपटारा होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षकारांचा वेळ व पैसा वाचणार असून परस्पर संमतीने वाद मिटल्याने समाजात सलोखा, सौहार्द आणि सामंजस्य वाढण्यासही मदत होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या शेतकरी व नागरिकांची महसुली दावे अथवा अपील प्रकरणे दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत आणि संबंधित प्रकरणातील दोन्ही पक्षकार परस्पर संमतीने तडजोड करण्यास तयार आहेत, त्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अनुप जावळे यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment