आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त 19 सप्टेंबर रोजी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम जास्तीत जास्त नागरिक, सामाजिक संस्था आणि नागरिक यांना सहभागी होण्यासाठी आवाहन

सिंधुदुर्ग, दि. 10 (जिमाका) : पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय (MOEF&CC), भारत सरकार यांच्या राष्ट्रीय किनारा अभियान (National Coastal Mission) अंतर्गत आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून दि. 19 सप्टेंबर 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक समुद्रकिनाऱ्यांवर समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत स्थानिक प्रशासनासोबतच नागरिकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. जिल्ह्यातील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यांतील विविध समुद्रकिनारे या स्वच्छता मोहिमेसाठी निवडण्यात आले आहेत. देवगड तालुक्यात विजयदुर्ग, कुणकेश्वर व मिठबाव, मालवण तालुक्यात तारकर्ली, देवबाग व आचरा तर वेंगुर्ला तालुक्यात भोगवे, शिरोडा व रेडी या समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. देवगड तालुक्यात नगरपंचायत देवगड तसेच संबंधित ग्रामपंचायतींच्या माध्यमातून, मालवण तालुक्यात नगरपरिषद मालवण व संबंधित ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आणि वेंगुर्ला तालुक्यात नगरपरिषद वेंगुर्ला व संबंधित ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. समुद्र किनारे स्वच्छता मोहिमेसाठी देवगड तालुक्यात जयप्रकाश परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग (ग्रामीण भाग) मोबाईल क्रमांक 9420257655 व मालवण व वेंगुर्ला तालुक्यात विनायक औंधकर, जिल्हा सह आयुक्त, नगरविकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (शहरी भाग) मोबाईल क्रमांक 9922926693 यांची निवड करण्यात आली आहे. समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत संबंधित गटविकास अधिकारी, नगरपालिका/नगरपंचायत विभाग यांच्या सहकार्याने ग्रामपंचायती, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, सामाजिक संस्था, स्वयंसेवक, स्थानिक मच्छीमार तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'