सेवा संकल्प अभियानातून जास्तीत जास्त नागरिकांना सेवांचा थेट लाभ द्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचना
सिंधुदुर्ग, दि. २१ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्ह्यात विविध विभागांच्या समन्वयातून जास्तीत जास्त कार्यक्रम राबवून नागरिकांना शासकीय सेवा व योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा. अभियानातील उपक्रमांमुळे झालेला थेट परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या.
सेवा संकल्प अभियानाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी धोडमिसे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, सेवा संकल्प अभियान संपूर्ण महिनाभर राबविण्यात येणार असून, विविध विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रातील योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागनिहाय नियोजन करावे. अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रम लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यावर भर द्यावा. प्रत्येक उपक्रमाची माहिती, त्यातून लाभ घेतलेल्या नागरिकांची संख्या आणि छायाचित्रांसह नियमितपणे अद्ययावत नोंद ठेवावी.
महसूल, आरोग्य, कौशल्य विकास व रोजगार, महिला व बाल विकास, समाज कल्याण, शिक्षण, क्रीडा, ग्रामविकास, नगरविकास, परिवहन, जलसंधारण व पाटबंधारे आदी विभागांच्या माध्यमातून अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये विविध सेवा व दाखले देण्यासाठी शिबिरे, रोजगार मेळावे, आरोग्य व रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण व स्वच्छता अभियान, विद्यार्थी स्पर्धा, व्यसनमुक्ती जनजागृती, जलसंधारणाची कामे तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण यांचा समावेश आहे.
अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध योजना, सेवा आणि उपक्रमांची माहिती देतानाच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यावर भर द्यावा. यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून उपलब्ध योजनांचा अधिकाधिक लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असेही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले.
परिवहन विभागामार्फत वाहन तपासणी शिबिरे आणि रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच प्रत्येक विभागाने आपल्या उपक्रमांचे नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि त्यातून साध्य झालेले फलित यावर विशेष लक्ष केंद्रित करावे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्याबरोबरच शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्पष्ट केले.
००००००




Comments
Post a Comment