‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध आरोग्य उपक्रमांना गती नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ व तत्पर आरोग्यसेवा देण्यासाठी विविध उपक्रम सुरू

सिंधुदुर्ग, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये विविध आरोग्यविषयक उपक्रम सध्या सुरू आहेत. नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ, तत्पर व नागरिककेंद्रित आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर अभियानामध्ये विशेष भर देण्यात येत आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात रक्तदान शिबिरे, महिलांचे आरोग्य, अवयवदान संकल्प अभियान, पोषण व अॅनिमिया जनजागृती, व्यसनमुक्त भारत, क्षयरोग निर्मूलन, जन्म-मृत्यू नोंदणी आदी विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. आरोग्य विभागाच्या विविध योजना व सेवांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत जनजागृतीही करण्यात येत आहे. असंसर्गजन्य आजारांच्या तपासणीला विशेष गती जिल्ह्यात उच्च रक्तदाब (Hypertension) व मधुमेह (Diabetes) यासाठी विशेष मोहीम सुरू असून, असंसर्गजन्य आजारांसाठी ३० वर्षे व त्यावरील वयोगटातील नागरिकांची तपासणी मोहीम स्वरूपात केली जात आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी Elderly Care Campaign अंतर्गत मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू (Cataract) व कर्करोग यांची तपासणी करण्यात येत आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न क्षयरोग निर्मूलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात विशेष प्रयत्न सुरू असून, उपचार सुरू न झालेल्या क्षयरुग्णांची संख्या किमान ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. क्षयरोगाचे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत आवश्यक कार्यवाही सुरू आहे. आयुष्मान भारत अभियानांतर्गत विशेष मोहीम सुरू आयुष्मान भारत अभियानांतर्गत MJPJAY व PMJAY कार्ड वितरणाची विशेष मोहीम जिल्ह्यात सुरू आहे. पात्र नागरिकांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत आवश्यक कार्यवाही व जनजागृती करण्यात येत आहे. तसेच ७० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वय वंदना कार्ड’ वाटपाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. माता व बाल आरोग्यावर विशेष भर गर्भवती महिलांमधील अॅनिमिया कमी करण्यासाठी विशेष मोहीम सुरू असून, मध्यम/तीव्र अॅनिमियाग्रस्त गर्भवती महिलांसाठी FCM (Ferric Carboxymaltose) इंजेक्शन देणे, किशोरवयीन मुली-मुलींची हिमोग्लोबिन तपासणी तसेच Early & Exclusive Breastfeeding बाबत जनजागृती करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी कार्यवाही आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये नागरिकांसाठी आरोग्य तपासणीचे आयोजन सुरू असून, CHO, ANM, MPW व ASHA यांना PHC स्तरावर प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना FRU (First Referral Unit) दर्जा देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ उपक्रमाला गती ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध कार्यशाळांचे आयोजन करून अभियानाला गती देण्यात येत आहे. तसेच सर्व आयुष आरोग्य संस्थांमध्ये वयोवृद्ध लोकांसाठी विशेष आरोग्य तपासणी व समुपदेशन मोहीम सुरू आहे. नागरिकांनी आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा अभियानाच्या कालावधीत आरोग्य विभागामार्फत विविध आरोग्य तपासण्या, जनजागृती कार्यक्रम व सेवा-सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांनी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष्मान आरोग्य मंदिर, ग्रामीण रुग्णालय तसेच इतर शासकीय आरोग्य संस्थांशी संपर्क साधून उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यामार्फत करण्यात आले आहे. ‘नागरिक प्रथम’ या दृष्टिकोनातून ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ची 8जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, नागरिकांना दर्जेदार, सुलभ व तत्पर आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'