महिला शेतकरी प्रमाणपत्र योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला गती महसूल व कृषी विभागाने तालुकावार संयुक्त शिबिरांचे आयोजन करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सिंधुदुर्ग, दि. २२ : जिल्ह्यात शेती व शेतीपूरक व्यवसायात सक्रिय असलेल्या महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळवून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला आता गती देण्यात येणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने सर्व तालुक्यांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम’ अंतर्गत देण्यात येणाऱ्या या प्रमाणपत्रामुळे शेतीमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांना मिळावा, यासाठी महसूल व कृषी विभागाने समन्वयाने नियोजन करून तालुकास्तरावर विशेष शिबिरे घ्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून महिलांना ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ योजनेची सविस्तर माहिती देण्यात येणार असून पात्र महिलांचे ऑनलाइन अर्ज जागेवरच भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना अर्ज प्रक्रियेसाठी स्वतंत्रपणे कार्यालयांमध्ये जाण्याची किंवा ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची चिंता राहणार नाही. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार ही मोहीम अधिक व्यापक करून तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. जमिनीची मालकी सातबारा उताऱ्यावर नसली तरी शेतात प्रत्यक्ष काम करणाऱ्या, मक्तेदारीने अथवा बटाईने शेती करणाऱ्या तसेच पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, रोपमळा, रेशीम शेती आणि अन्य शेतीपूरक व्यवसायांशी जोडलेल्या १८ वर्षांवरील महिला या प्रमाणपत्रासाठी पात्र आहेत. प्रमाणपत्राच्या माध्यमातून महिलांना कृषी विभागाच्या विविध शासकीय योजना व अनुदानांचा लाभ घेणे, पीक कर्जाची सुविधा मिळविणे तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. या योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी कृषी विभागासोबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)/माविम तसेच महिला व बालविकास विभागानेही समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या कडून देण्यात आल्या आहेत. संबंधित यंत्रणांनी आपल्या माध्यमातून पात्र महिलांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवून त्यांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, पात्र महिलांनी https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service/apply/ या कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा किंवा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'