भेडशीतील गणेशोत्सव मंडळाच्या आवारात ‘लोकसंवाद-2026’

सिंधुदुर्ग, दि. 18 (जिमाका): गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात शासनाच्या योजना आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने भेडशी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आवारात ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना, अडचणींना आणि शासनाच्या योजनांबाबतच्या अपेक्षांना जाणून घेण्यात आले. ‘लोकसंवाद-2026’च्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळे ही केवळ सांस्कृतिक उपक्रमांची केंद्रे न राहता शासकीय माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहेत. यावेळी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, शासकीय सेवा आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल युगातील सुरक्षिततेच्या दृष्टीने सायबर सुरक्षेबाबत तसेच गणेशोत्सवाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करणाऱ्या ‘Bappa.org’ पोर्टलबाबतही माहिती देण्यात आली. महसूल विभागामार्फत उपलब्ध विविध सेवांची माहिती मंडळ अधिकारी सचिन गोरे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ग्रामपंचायती आणि नागरिकांच्या सहभागातून ‘लोकसंवाद-2026’ उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध विभागांच्या समन्वयातून योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यावर या उपक्रमात भर देण्यात येत आहे. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भेडशीचे अध्यक्ष नंदकिशोर टोपले, ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी, उदय सरवणकर, मिथुन बेळेकर, प्रदीप टोपले, गौरीश वेटे, गुरुनाथ डांगी, राजदत्त वेटे,आनंद काणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. माहिती कार्यालयाच्या वतीने मंडळास ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमातील सहभागाबद्दल सन्मानचिन्ह देण्यात आले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'