महसुली व अर्धन्यायिक प्रकरणांचा आपापसातील तडजोडीने कायमस्वरूपी निपटारा

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : महसूल प्रशासनातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली जमिनीशी संबंधित दावे व अपिले संबंधित पक्षकारांच्या आपापसातील सहमतीने आणि तडजोडीने जलदगतीने निकाली काढण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्यभर १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामुळे महसूल न्यायालयांमध्ये दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रकरणे पक्षकारांच्या परस्पर संमतीने निकाली काढून नागरिकांचा वेळ, पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेतील खर्च वाचण्यास मदत होणार आहे. सर्व स्तरांवरील महसूल न्यायालयांतील प्रकरणांचा समावेश मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले महसुली दावे व अपिलांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत दर तीन महिन्यांनी महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. संबंधित पक्षकारांनी परस्पर सहमतीने तडजोड केल्यास त्यानुसार कायदेशीर तडजोडनामा तयार करून लोक अदालतीच्या दिवशी अंतिम आदेश पारित करण्यात येईल. अशी आहे अर्ज प्रक्रिया ज्या महसूल न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे, त्या न्यायालयात दोन्ही पक्षकारांनी किंवा त्यांच्या वकिलांमार्फत विहित नमुन्यातील ‘प्रपत्र-अ’ मध्ये तडजोडीसाठी अर्ज सादर करावा. अर्जाची छाननी केल्यानंतर दोन्ही पक्षांच्या संमतीने कायदेशीर तडजोडनामा तयार करण्यात येईल. त्यानंतर निश्चित केलेल्या लोक अदालतीच्या दिवशी सहमतीच्या आधारे अंतिम आदेश पारित करून प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल. विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अदालतीप्रमाणेच या अभियानातही पक्षकारांच्या संमतीने आणि तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. त्यामुळे वरिष्ठ न्यायालयांमध्ये वारंवार होणाऱ्या अपिलांची शक्यता कमी होऊन नागरिकांचा वेळ व पैसा वाचण्यास मदत होणार आहे. सावंतवाडी उपविभागात दोन ठिकाणी आयोजन उपविभागीय अधिकारी कार्यालय, सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांच्याकडील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील अपिले १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता. तहसीलदार कार्यालय, वेंगुर्ला उपविभागीय अधिकारी यांच्याकडील वेंगुर्ला तालुक्यातील अपिले २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता याप्रमाणे सावंतवाडी उपविभागातील प्रलंबित महसुली प्रकरणांचा जलद व कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी महसूल लोक अदालतीचे नियोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी उपविभागातील सर्व संबंधित हितसंबंधित, पक्षकार, अर्जदार व नागरिकांनी आपल्या प्रलंबित महसुली प्रकरणाचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी ज्या महसूल न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे, त्या कार्यालयाशी विहित कालावधीत संपर्क साधावा आणि या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे यांनी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'