जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आवळेगाव येथे ‘पॉक्सो’ कायद्याबाबत विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न
सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आवळेगाव नं. 1 यांच्या सहकार्याने दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी 'पॉक्सो' (POCSO) कायद्याबाबत विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न झाल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड.प्रणिता कोटकर-राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करण्यासाठी असलेल्या 'पॉक्सो' कायद्याची व्याप्ती आणि त्यातील कायदेशीर तरतुदींची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, याउद्देशाने हे शिबीर घेण्यात आले. कायद्याचे ज्ञान हीच संरक्षणाची ढाल हे ब्रीदवाक्य घेऊन ॲड.प्रणिता कोटकर-राऊळ यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, पॉक्सो कायदा सर्व मुलांनी पालकांनी आणि शिक्षकांनी जाणून घेतलाच पाहिजे. मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदे असून चालणार नाही, तर पालक आणि शिक्षकांनी सजग राहणे गरजेचे आहे. मुलांशी संवाद वाढवून त्यांना 'सुरक्षित स्पर्श' आणि 'असुरक्षित स्पर्श ' मधील फरक समजावून सांगणे आवश्यक आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराची तक्रार त्वरित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा चाईल्ड हेल्पलाईनकडे कशी करावी, याचे प्रात्यक्षिकही यावेळी देण्यात आले.
कार्यक्रमात पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्रीम. स्नेहल ठाकूर यांनी शाळेत मुलांच्या सुरक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या खबरदारीबद्दल माहिती दिली. या शिबिराला मोठ्या संख्येने पालक, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. पूर्वा गावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीम. स्नेहल ठाकूर यांनी मानले.
०००००००००
Comments
Post a Comment