कायदेविषयक शिबिराचे मालवण येथे आयोजन

• १ मार्च रोजी मालवण येथे भव्य कायदेविषयक सेवा शिबीर • जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आयोजन • मेगा लीगल सर्व्हिसेस कॅम्प’द्वारे शासकीय योजना थेट जनतेच्या दारी सिंधुदुर्गनगरी दिनांक १२ (जिमाका) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ‘NALSA New Module’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य कायदेविषयक सेवा शिबीर (Mega Legal Services Camp) आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्ह्यातील सर्व वकील संघ तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी रा. ब. अनंत शिवाजी देसाई (टोपीवाला) हायस्कूल, मालवण येथे हे शिबीर पार पडणार आहे. या शिबिराच्या नियोजनासाठी मा. डॉ. सुधीर देशपांडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा सरकारी अभियोक्ता तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, पोलिस अधीक्षक कार्यालय आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या महामेळाव्याचा मुख्य उद्देश शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील वंचित, दुर्बल व गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आणि त्यांना योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हा आहे. शिबिरात आरोग्य, शिक्षण, कृषी, समाजकल्याण, पोस्ट ऑफीस, महिला व बाल विकास, मत्स्यव्यवसाय, आदिवासी विकास, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), एसटी महामंडळ आदी विभागांचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात येणार असून, योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागीच भरून घेणे तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नागरिकांना मोफत कायदेविषयक सल्ला, विविध कायदेशीर हक्कांबाबत मार्गदर्शन तसेच न्यायालयीन प्रक्रियेविषयी माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय निवडक लाभार्थ्यांना योजनांचा प्रातिनिधिक लाभ वाटप करण्यात येणार असून, आरोग्य विभागामार्फत सर्व उपस्थित नागरिकांची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा तसेच मोफत विधी सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा. डॉ. सुधीर देशपांडे, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सौ. संपूर्णा गुंडेवाडी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग तसेच तालुका विधी सेवा समिती—सावंतवाडी, कणकवली, देवगड, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ व दोडामार्ग-येथील कार्यालयांशी संपर्क साधावा. ई-मेल : dlsa-sindhu@bhc.gov.in, दूरध्वनी: ०२३६२-२२८४१४ / ८५९१९०३६०७, हेल्पलाईन : १५१०० 00000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'