भारतीय संत परंपरेत समाज प्रबोधनाचे, नैतिक मूल्यांचे आणि मानवतेचे दीपस्तंभ म्हणून संत सेवालाल महाराजांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. ते बंजारा (लमाण) समाजाचे महान संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनातून सत्य, परिश्रम, प्रामाणिकपणा, समता, करुणा आणि बंधुभाव यांचा संदेश दिला. म्हणूनच संत सेवालाल महाराजांची जयंती हा केवळ उत्सवाचा दिवस नसून, त्यांच्या विचारांचे स्मरण करून ते आचरणात आणण्याचा पवित्र दिवस आहे.
संत सेवालाल महाराजांचे बालपण व व्यक्तिमत्त्व
संत सेवालाल महाराजांचा जन्म साध्या बंजारा कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांच्यात विलक्षण बुद्धिमत्ता, निरीक्षणशक्ती आणि करुणा दिसून येत होती. समाजातील गरिबी, अज्ञान, अन्याय आणि दुःख पाहून त्यांच्या मनात समाजपरिवर्तनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यांनी सांसारिक लोभ, लालसा आणि स्वार्थापेक्षा समाजहिताला अधिक महत्त्व दिले. साधे राहणीमान, संयमी आचार-विचार आणि उच्च नैतिक मूल्ये हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य होते.
सामाजिक परिस्थिती
संत सेवालाल महाराजांच्या काळात बंजारा समाज अनेक सामाजिक कुप्रथांनी ग्रासलेला होता. व्यसनाधीनता, चोरी, हिंसा, अंधश्रद्धा आणि शिक्षणाचा अभाव यांमुळे समाज मागासलेला होता. या परिस्थितीमुळे समाजाची प्रतिमा डागाळत होती आणि प्रगतीला अडथळे निर्माण होत होते. संत सेवालाल महाराजांनी या समस्यांची मूळ ओळखून त्यावर उपाय सुचवले आणि समाजाला योग्य दिशा दिली.
समाजसुधारणेचे कार्य
संत सेवालाल महाराज हे केवळ उपदेशक नव्हते, तर कृतीशील समाजसुधारक होते. त्यांनी चोरी, व्यसन आणि हिंसा यांसारख्या वाईट प्रवृत्तींना ठाम विरोध केला.
“परिश्रम हाच खरा धर्म आहे” हा त्यांचा मूलमंत्र होता. त्यांनी प्रत्येकाला कष्ट करून प्रामाणिक जीवन जगण्याचा संदेश दिला. अन्यायाने किंवा फसवणुकीने मिळवलेली संपत्ती त्यांनी नाकारली आणि श्रमातून मिळालेल्या अन्नालाच पवित्र मानले.
धार्मिक व नैतिक विचार
संत सेवालाल महाराजांचा धर्मविषयक दृष्टिकोन अत्यंत व्यापक होता. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे, तर सदाचार आहे, हे त्यांनी समाजाला पटवून दिले. सत्य बोलणे, दुसऱ्याच्या हक्कावर गदा न आणणे, गरजूंची मदत करणे, वृद्धांचा सन्मान करणे आणि स्त्री-पुरुष समानता पाळणे—हीच खरी धार्मिकता आहे, असे ते सांगत.
सर्व धर्मांचा सन्मान करावा, जात-पात, उच्च-नीच भेद न करता मानवतेला सर्वोच्च स्थान द्यावे, हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे.
स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक न्याय
त्या काळात स्त्रियांकडे दुर्लक्ष केले जात असे. संत सेवालाल महाराजांनी स्त्री-पुरुष समानतेचा स्पष्ट पुरस्कार केला. स्त्री ही पुरुषाइतकीच सक्षम आहे, तिचा सन्मान झाला पाहिजे, असा त्यांनी आग्रह धरला. सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमान यांचा संदेश देत त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणला.
निसर्गप्रेम व पर्यावरणविषयक दृष्टी
संत सेवालाल महाराजांना निसर्गाविषयी अपार प्रेम होते. झाडे, पशुपक्षी आणि पर्यावरण यांचे संरक्षण करणे हे मानवाचे कर्तव्य आहे, असे ते मानत. निसर्गाचा समतोल राखल्यासच मानवाचे जीवन सुखी व समृद्ध होईल, ही त्यांची ठाम धारणा होती. आजच्या पर्यावरणीय संकटांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे विचार अधिकच महत्त्वाचे वाटतात.
सामाजिक सलोखा व बंधुभाव
समाजात ऐक्य नसेल, तर प्रगती शक्य नाही, हे संत सेवालाल महाराजांनी ओळखले होते. त्यांनी सर्व समाजघटकांमध्ये बंधुभाव वाढवण्याचा प्रयत्न केला. परस्पर सहकार्य, प्रेम आणि विश्वास यांवर समाज उभा राहतो, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळेच त्यांच्या विचारांमुळे समाजात सलोखा आणि आत्मसन्मान वाढला.
संत सेवालाल महाराजांचा समाजावर प्रभाव
संत सेवालाल महाराजांच्या विचारांमुळे बंजारा समाजात मोठे परिवर्तन घडून आले. व्यसनमुक्ती, प्रामाणिक श्रम, शिक्षणाची आवड आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्यास त्यांच्या शिकवणीचा मोठा वाटा आहे. त्यांच्या विचारांनी समाजाला आत्मविश्वास दिला आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा दिली.
जयंतीचे महत्त्व आणि आजची उपयुक्तता
संत सेवालाल महाराजांची जयंती विविध ठिकाणी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी प्रवचने, कीर्तन, सामाजिक प्रबोधन कार्यक्रम, स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण आणि गरजूंसाठी मदतकार्य केले जाते.
जयंती साजरी करण्याचा खरा अर्थ म्हणजे केवळ मिरवणूक किंवा कार्यक्रम नव्हे, तर त्यांच्या विचारांचे आचरण करणे होय. आजच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनात सत्य, परिश्रम आणि मानवतेचा मार्ग दाखवणारे त्यांचे विचार अत्यंत मार्गदर्शक ठरतात.
संत सेवालाल महाराज हे केवळ एका समाजाचे संत नव्हते, तर संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शक होते. त्यांचे जीवन हे सत्य, श्रम, करुणा आणि समतेचा जिवंत आदर्श आहे. आधुनिक युगातही त्यांच्या विचारांची गरज अधिक जाणवते. संत सेवालाल महाराजांचा आदर्श स्वीकारून आपण प्रामाणिक, सदाचारी आणि समाजोपयोगी जीवन जगलो, तरच त्यांच्या जयंतीचे खरे सार्थक होईल.
-रणजित पवार,
उपसंपादक, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर
00000
राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (जिमाका) दि. 29 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण ...
Comments
Post a Comment