कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांचे “माझी वसुंधरा अभियान 5.0” मध्ये उल्लेखनीय यश

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची घोषणा करण्यात आली असून, कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांना मानाचा सन्मान प्राप्त झाला आहे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण, स्वच्छता, हरित उपक्रम आणि पंचतत्वांवर आधारित विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालील नगरपालिकांनी विशेष यश संपादन केले आहे: वेंगुर्ला नगरपरिषद – 15 हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात विभागस्तरावर प्रथम क्रमांक कुडाळ नगरपंचायत – 15 हजार ते 25 हजार लोकसंख्या गटात विभागस्तरावर प्रथम क्रमांक तसेच ग्रामपंचायत स्तरावरही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी लक्षणीय प्रगती दर्शवली असून, पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. या अभियानात राज्यातील 28,000 हून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. डेस्कटॉप व फिल्ड मूल्यांकनाच्या आधारे गुणांकन करून विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. विजेत्या संस्थांना शासनामार्फत रोख पारितोषिक देण्यात येणार असून, त्या निधीचा वापर पर्यावरण संवर्धनाशी संबंधित उपक्रमांसाठी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संबंधित नगरपालिका प्रशासन, अधिकारी व नागरिकांनी संपादन केलेल्या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पर्यावरणपूरक कार्यामुळे कोकण विभागाला अभिमान वाटावा अशी ही कामगिरी आहे. ०००००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'