‘महास्वच्छता अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) :- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने "स्वच्छता ही सेवा" (SHS) मोहीम 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून गुरुवार, 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत "महास्वच्छता अभियान" राबविण्यात येणार असून "एक दिवस, एक तास, एक साथ" या संकल्पनेवर आधारित देशव्यापी श्रमदान उपक्रमात जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.
या वर्षी "स्वच्छता ही सेवा 2025" साठी "स्वच्छोत्सव" ही थीम निश्चित करण्यात आली आहे. मोहिमेअंतर्गत तालुका व गावस्तरावर परिसर स्वच्छतेचे उपक्रम सुरू असून अस्वच्छ ठिकाणांची निवड करून त्यांची मॅपिंग व साफसफाई करण्यात येत आहे. दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित महास्वच्छता अभियानात ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला बचत गट, युवक, शासकीय कर्मचारी यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे. यावेळी गावातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे. गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या महास्वच्छता अभियानाची प्रभावी प्रसिद्धी व जनजागृती करण्यासाठी गावपातळीवर व्हॉट्सअॅप ग्रुप, दवंडी, नोटीस तसेच सार्वजनिक ठिकाणी फलक लावावेत. जास्तीत जास्त ग्रामस्थांचा सहभाग मिळविण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी योग्य नियोजन करावे, असेही आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment