माती परीक्षण प्रयोगशाळा उभारणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- जमीन आरोग्य सुपीकता कार्यक्रम 2025-26 अंतर्गत ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा (VSTL) उभारणीसाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिक्षक भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने राज्यात कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजना राबवली जात आहे. या योजनेचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे जिल्ह्यांमध्ये ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा (VSTL) उभारणी करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे आणि गावपातळीवर मातीच्या नमुन्यांचे विश्लेषण करुन शेतकऱ्यांसाठी मृदा आरोग्य पत्रिका तयार करणे हा आहे.
जिल्ह्यात अशा दोन ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळांची उभारणी करायची आहे. या अंतर्गत प्रत्येक प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी एकदाच 1 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. याशिवाय, पहिल्या 300 माती नमुन्यांच्या तपासणी आणि आरोग्य पत्रिका तयार करण्यासाठी प्रति नमुना 300 रुपये (RKVY मधून) आणि त्यानंतरच्या 500 नमुन्यांसाठी प्रति नमूना 20 रुपये प्रोत्साहनपर (incentive) रक्कम देण्यात येईल. यानंतर, माती नमुन्यांची तपासणी राज्य शासनाच्या मान्य दराने केली जाईल.
या योजनेसाठी व्यक्ती, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), PACS, कृषी चिकित्सालय, कृषी व्यवसाय केंद्रे, माजी सैनिक, बचत गट (SHG), शेतकरी सहकारी संस्था, निविष्ठा किरकोळ विक्रेते आणि शाळा/महाविद्यालयातील युवक-युवती अर्ज करु शकतात.
अटी व शर्ती :
अर्जदार, उद्योजक, गटाकडे किमान चार वर्षांसाठी भाड्याच्या करारासह किंवा स्वतःच्या मालकीची जागा, इमारत असावी, वैयक्तिक अर्जदार तरुणाचे वय 18 ते 27 वर्षांदरम्यान असावे व शैक्षणिक पात्रता किमान 10 वी उत्तीर्ण असावी.
इच्छुक अर्जदारांनी 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या छायांकित सत्यप्रतीसह दिनांक 15 सप्टेंबर 2025 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी आपण संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा मृद सर्वेक्षण प्रयोगशाळा, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधू शकता.
०००००००
Comments
Post a Comment