महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 26 (जिमाका) :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालयामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता पात्र लाभार्थ्यांकडून महामंडळ राबवीत असलेल्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या). जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
मागासवर्गीय समाजघटकांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध योजनांचा लाभ राबविण्यात येतो. या योजनांद्वारे लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आर्थिक सक्षमीकरण घडविणे आणि जीवनमान उंचावणे हा प्रमुख उद्देश या महामंडळाचा आहे. हा अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून, इच्छुक लाभार्थ्यांनी या महामंडळाच्या https://mpbcdc.maharashtra.gov.in किंवा https://mahadisha.in या संकेतस्थळाच्या पोर्टल द्वारे आपले कर्ज मागणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादरीकरण करताना लाभार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. कोणतेही अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत.
महामंडळामार्फत उपलब्ध योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :
५० टक्के अनुदान योजना : एकूण प्रकल्प खर्च : ५०,०००/-, महामंडळाचे अनुदान : २५,०००/-, बँक कर्ज : २५,०००/- या योजनेद्वारे लहान व्यवसाय, सूक्ष्म उद्योग व उपजीविकेस पूरक अशा उपक्रमांना चालना दिली जाते.
बीज भांडवल योजना : प्रकल्प खर्च : ५०,००१/- ते ५,००,०००/-, महामंडळ सहभाग : २० टक्के (जास्तीत जास्त ५०,०००/- अनुदान), बँक सहभाग : ७५ टक्के (बँकेच्या विद्यमान व्याजदराने कर्ज), लाभार्थी सहभाग : ५ टक्के, कर्ज परतफेडीचा कालावधी : ५वर्षे.
या योजनेद्वारे उद्योजकता विकसित करण्यासाठी उपयुक्त असून, लाभार्थ्यांना स्थिर व टिकाऊ व्यवसाय उभारता येतो.
थेट कर्ज योजना :महामंडळामार्फत थेट लाभार्थ्यांना १,००,०००/- पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ही योजना जलद व सुलभ पद्धतीने अंमलात आणली जाते, ज्यामुळे अल्पावधीतच लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करता येतो.
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (NSFDC) योजना : एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी रोजगार व उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये लघु उद्योग, व्यवसाय, शिक्षण व प्रशिक्षण यांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ (NSKFDC) योजना : सफाई कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील घटकांना सन्मानपूर्वक उपजीविका मिळावी यासाठी या महामंडळाकडून कर्ज व सहाय्य योजनांचा लाभ दिला जातो. या योजनेमुळे उपजीविकेचे वैविध्य निर्माण करून सामाजिक उन्नती साधता येते.
अर्ज करण्यास आवश्यक पात्रता : अर्जदार अनुसूचित जाती व नवबौध्द तसेच हिंदू खाटीक, बुरुड संवर्गातील असावा व त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे. वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी विभागासाठी रु. २.५० लाख एवढी आहे. अर्जदार हा महामंडळाच्या योजनांचा व इतर वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
अर्ज करणेस आवश्यक कागदपत्रे : जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला दाखला. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो. रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड प्रत. कोटेशन व व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या जागेचा पुरावा, व्यवसायनुरुप इतर आवश्यक दाखले. आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल. बँक खाते क्रमांक पासबुकची झेरॉक्स प्रत.
वरील सर्व योजनांची सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी व पात्रतेच्या अटी महामंडळाच्या महादिशा पोर्टल वर उपलब्ध आहेत. तरी सर्व इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी माहिती नीट वाचून समजून घेणे अत्यावश्यक आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज भरावेत.
००००००
Comments
Post a Comment