‘निरक्षरतेचा कलंक पुसून आम्ही होणार साक्षर संकल्प साध्य करण्यासाठी परीक्षार्थीचा उत्कृष्ठ सहभाग’

सिंधुदुर्गनगरी दिनांक 23 (जिमाका) :- केंद्रपुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन 2022 ते 2027 या कालावधीच्या कालावधीतील तीन वेळा राज्यासह सिंधुदुर्गात परीक्षा घेतली आहे. 21 सप्टेंबर रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) सपन्न झाली, असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (योजना) निलिमा नाईक यांनी दिली आहे. 15 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींमध्ये महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करावयाची आहेत. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण, इ. बाबींचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 मध्ये उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची रविवार 21 सप्टेंबर, 2025 रोजी चाचणी घेण्यात आली. यु-डायस क्रमांकानुसार असाक्षरांची नोंदणी केलेली प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र होती. परीक्षा केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ऑफलाईन पद्धतीने व असाक्षरांच्या सोयीनुसार चाचणी घेण्यात आली. ही चाचणी एकूण 150 गुणांची घेण्यात आली. अनुक्रमे भाग क (वाचन) 50 गुण, भाग ख (लेखन) 50 गुण, भाग ग (संख्याज्ञान) 50 गुण, चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी 33 टक्के (16.5 गुण) अनिवार्य आहेत व एकूण 150 गुणांपैकी 33 टक्के (49.5 गुण) अनिवार्य असतील. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत 3 तासांचा होता. (दिव्यांग व्यक्तीसाठी 60 मिनिटे जादा वेळ) जिल्ह्यात मराठी, उर्दू या 2 माध्यमांतून ही चाचणी घेण्यात आली. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) विहित निकषानुसार उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र / गुणपत्रक देण्यात येणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरुकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण ही जीवनकौशल्ये विकसित होतील. तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. चाचणी परीक्षा केंद्रास जिल्ह्यातील अधिकारी वर्ग भेट देत होता तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले जिल्हा परीक्षा निरीक्षक यांनी विविध परीक्षा केंद्रावर भेटी देवून असाक्षरांचा परीक्षा देण्याचा उत्साह वाढविला. चाचणी यशस्वी व निर्विघ्रपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्याचे प्राचार्य डाएट, शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य/योजना), तालुकास्तरावर तहसिलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी गटसाधन केंद्रातील अधिकारी/कर्मचारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व स्वयंसेवक यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 639 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात 4 हजार 555 इतक्या असाक्षरांनी परीक्षा देणे अपेक्षित होते. त्यापैकी सुमारे 3 हजार 818 इतक्या असाक्षरांनी परीक्षा दिली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी परीक्षेस दिलेल्या उत्कृष्ठ प्रतिसाबद्दल परिक्षार्थीचा तसेच परीक्षेच्या यशस्वी नियोजनात सहभागी सर्व घटकांचे अभिनंदन केले. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'