राष्ट्रीय व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती
सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण याच्या संयुक्त किमान कार्यक्रमांतर्गत जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत परिचार्या प्रशिक्षण विद्यालय, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे जन जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास परिचार्या प्रशिक्षण विद्यालयाच्या प्रचार्या एस. जी. म्हाखले तसेच अन्य अध्यापक वृंद तसेच परिचार्या विद्यालयाच्या विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळुणकर यांनी लोकसंख्येच्या प्रश्नाबाबत सविस्तर उहापोह केला. त्यांनी याबाबतच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक कारणांची पार्श्वभूमी सांगून त्यांच्या निवारणासाठी असलेले उपाय सविस्तर कथन केले. श्री. चिपळुणकर यांनी लोकसंख्येच्या प्रश्नाबाबत कोणत्या शास्त्रीय उपाययोजना केल्या पाहिजेत याचे विवेचन केले.
प्रचार्या एस. जी. म्हाखले यांनी देखील या विषयाबाबत मार्गदर्शन केले. मुख्य लोकभिरक्षक अॅड. डी. के. गावकर आणि सहाय्यक लोकभिरक्षक अॅड. श्वेता तेंडुलकर यांनी जागतिक लोकसंख्येच्या प्रश्नाबाबत माहिती दिली व आवश्यक उपाय योजनांबाबत चर्चा करुन श्रोत्यांना असे आवाहन केले की, याबाबत प्रत्येकाने स्वतः पासून उपायांच्या अंमलबजावणीची सुरुवात करावी.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अ. बा. कुरणे यांनी सदर विषयाबाबत मार्गदर्शन केले तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत देण्यात येणारे विधी सहाय्य व सेवा याबाबत सविस्तर माहिती दिली.
Comments
Post a Comment