आयटीआय प्रवेशासाठी 11 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज
सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) : औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रवेश प्रक्रिया दिनांक 12 जून पासून सुरु करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन प.संखे यांनी केले आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरुपात संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावूर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रीयेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय उभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये राज्यभरात एकूण 85 व्यवसाय उपलब्ध असून 154932 एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 652 नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरु करण्याचे प्रस्तावीत आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्या वेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेली आहे. विविध प्रवर्गाच्य उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे.
दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करुन त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावे.
००००
Comments
Post a Comment