जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी जिल्हास्तरीय समिती गठित
सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.) : उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या शासन निर्णयामध्ये निर्देशित केलेप्रमाणे जादूटोणा विरोधी कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शाळा, कॉलेजात व्याख्यान आयोजित करणे, वक्ते पाठवणे, कार्यक्रम संपन्न करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यामध्ये सदर कायद्याची प्रभावी अंमलबजावणीकरीता व संस्कारातून रुजलेल्या गैरसमजुतीमुळे जातीयता, उच्चनिचता, गटपंथांमधील परस्पर व्देष, स्त्री-पुरुष असमानता, दारिद्रय अशा मानवतेसाठी घातक असणाऱ्या गोष्टी विरोधी कायदा जनजागृती प्रचार कार्यक्रम राबविण्याचे नियोजित आहे. तसेच, अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रचार व प्रसाराचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
तरी जिल्हयामधील अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्या किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था किंवा समाजसेवक यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, या विभागाच्या सहकार्याने विना मोबदला मार्गदर्शन व समाज प्रबोधन करून सामान्य जनतेच्या मनातील गैरसमजुती दूर करण्याचे आहे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment