अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्प नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा -निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का.) : अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणातील पाणी पातळी 159.50 पर्यंत भरली असून कुठल्याही क्षणी धरणातील पाण्याचा विसर्ग सांडव्यावरून चालू होणार आहे. त्यामुळे धरण क्षेत्रबाहेरील नदीमध्ये पाणी पातळी वाढणार आहे. त्या अनुषंगाने नदीकाठच्या ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना दिनांक 7.7.2023 रोजी पासून पावसाळी हंगाम संपेपर्यंत नदीपात्रातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नदी पात्रात उतरू नये, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले. दि. 7 जुलै 2023 पासून पावसाळी हंगाम संपेपर्यंत नदीपात्रातील प्रवाह कधीही वाढू शकत असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या मांगवली, वेंगसर, हेत, ता. वैभववाडी व चिंचवली, खारेपाटण ता. कणकवली या गावातील नागरिकांना दक्षता घेण्याबाबत सूचना निर्गमित कारणे आवश्यक आहे. या संदर्भात पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या मांगवली, वेंगसर, हेत, ता. वैभववाडी व चिंचवली, खारेपाटण ता.कणकवली गावातील ग्रामस्थांना सदर बाबीची माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय तसेच गावातील लोकांच्या निदर्शनास येतील अशा ठिकाणी फलकावर सूचना प्रसिद्ध कराव्यात. रात्रीच्या वेळी नागरिकांना सदर नदी पात्रातून ये जा करू नये. नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी याबाबत आवश्यक ती सतर्कता बाळगावी. मांगवली, वेंगसर, हेत. ता. वैभववाडी व चिंचवली, खारेपाटण ता. कणकवली या ग्रामपंचायतीनी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असलेबाबत दवंडी पिटवून लोकांना माहिती द्यावी. नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून पुलांवर पाणी आल्यास अशा पुलांवरून वाहतूक होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. तसेच अशा पुलाच्या ठिकाणी पोलीस तैनात ठेवावेत. तालुक्यातील शोध व बचाव गटातील पाहणारे सदस्य यांच्या संपर्कात रहावे व त्यांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तालुक्यातील शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवण्यात यावे. विशेषतः पूरस्थिती निर्माण होवून लोकांना स्थलांतरित करावयाचे झाल्यास त्याकरिता होड्यांची तजवीज करण्यात यावी. एखादी आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास त्याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षास त्वरित माहिती द्यावी. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'