ई- पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा - विजयकुमार राऊत
सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.) : खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी या पिकांकरिता ई- पीक विमा उतरविता येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई-पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरिता येणाऱ्या प्रधानमंत्री पीक योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरिता विमा संरक्षण लाभणार आहे. खरीप हंगामामध्ये कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी या पिकांकरिता पीक विमा उत्तरविता येईल. शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम रु. 1/- वजा जाता राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करावे. घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल.
जिल्ह्यातील भात पिकाकरिता अधिसूचित असलेल्या 57 महसूल मंडळांमध्ये, नाचणी पिकाकरिता अधिसूचित 52 महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे.
पीक- भात, विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर), 51 हजार 760, जोखिम स्तर, 70 टक्के, नागली- विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर), 20 हजार, जोखिम स्तर 70 टक्के आहे.
ई - पीक पाहणीद्वारे नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी. योजनेची अमलबजावणी करताना रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी, ड्रोन, स्मार्टफोन, डिजिटल माहिती स्रोत अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येईल. विविध जोखार्मितर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनातील अटी व शतीचा अधीन राहून निश्चित केली जाईल.
खरीप हंगाम 2023 करिता सहभागाची अंतिम मुदत दिनांक 31 जूलै 2023 अशी आहे. पीक विम्यासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड, पेरणी घोषणापत्र, बँकखात्याचे तपशील प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. पीक विमा पोर्टल, विमा कंपनी संकेतस्थळ, बँक, पीक विमा ऍप इत्यादी माध्यमांद्वारे शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. पीक विमा योजनेचे अर्ज भरताना बँकामधील गर्दी टाळावी याकरिता जनसुविधा केंद्रामार्फत (सी.एस.सी.) ऑनलाइन पद्धतीने पीक विमा अर्ज दाखल करण्यात येईल.
शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी कृषी विभागाकडून घेण्यात येईल. शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याकरीता योजनेत मोठया प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment