केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा कल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविणे - अजय कुमार मिश्रा

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का.) : केंद्र शासन जनसामान्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. ह्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन नवीन सभागृहात केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा श्री. मिश्रा यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, तहसिलदार करीष्मा नायर आदी उपस्थित होते. श्री. मिश्रा म्हणाले, जनसामान्यांचे राहणीमान उंचावावे, त्यांना आरोग्य, शैक्षणिक तसेच इतर सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. ह्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात संबंधित यंत्रणांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे सरकारच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने आपत्कालीन यंत्रणांनी देखील सज्ज राहण्याचे निर्देश श्री. मिश्रा यांनी संबंधितांना दिले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केंद्र शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांच्या सद्यस्थितीची माहिती श्री. मिश्रा यांना यावेळी दिली. यावेळी केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, मिशन अमृत सरोवर, मनरेगा, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, आयुष्यमान भारत येाजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी अशा अनेक योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'