मल्हार पुलासाठी पर्यायी मार्ग उभारा अतिवृष्टीने नुकसान झालेले साकव, पुल आणि रस्ते यांची कामे तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – मल्हारपूल कोसळल्यामुळे 5 हून जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. या पुलाचे स्टक्चरल ऑडिट करावे, पर्यायी साकव उभारावा अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. कणकवली तालुक्यातील कनेडी येथील मल्हार पुलाची पालकमंत्री श्री.सामंत यांनी आज पहाणी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. मल्हार पुलाला पर्यायी असलेल्या रस्त्यासह खारेपाटण, नाटळ या पूरग्रस्त भांगाचीही त्यांनी यावेळी पहाणी केली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संजय पडते, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, अधिक्षक कृषी अधिकारी एस.एन.म्हेत्रे, तहसिलदार आर.के.पवार, कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, उपअभियंता के.के. प्रभू यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सर्वच साकव, पूल आणि रस्ते यांची यादी तयार करण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी पुलांचे नुकसान झाले आहे, त्या त्या ठिकाणी स्टक्चरल ऑडिट करण्यात यावे. ज्या ठिकाणी पर्यायी मार्ग नाही, त्या ठिकाणी प्राथमिकतेने साकवांची दुरुस्ती करण्यात यावी. साकव वाहून गेलेल्या ठिकाणी ते उभारण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी. संपर्क तुटलेल्या गावांचीही यादी तयार करून नैसर्गिक आपत्तीमध्ये या गावांचा संपर्क तुटणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तौक्ते चक्रीवादळाची नुकसान भरपाईसाठीचे 45 कोटी 49 लक्ष 33 हजार रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. नुकसान भरपाई वाटपाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून श्री. सामंत म्हणाले, काही ठिकाणी तांत्रिक कारणामुळे मदतीचे वाटप राहिले आहे. त्यावर तोडगा काढून तातडीने मदतीचे वाटप होईल असे नियोजन करण्यात येईल. खारेपाटण येथे रस्त्याची उंची वाढवण्याचे कामही लवकर हाती घेण्यात यावे. अभूतपूर्व अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये घाट रस्ते बंद होऊ नयेत यासाठी तसेच इतर संकंटाचा सामना करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येतील. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकापर्यंत मदत पोहचवण्यात येईल. प्रत्येक घटकाला मदत मिळेल यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी तिलारी प्रकल्प, अतिवृष्टी, जिल्ह्यातील पूर परिस्थिती, कोविड - 19 अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, वंदना खरमाळे, सुशांत खांडेकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम संजय शेवाळे, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता म.श्री. कदम, महावितरणचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर आदींसह सर्व तालुक्यांचे तहसिलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. चिपळूण मदतकार्यातील सहभागी मालवण आपत्कालिन ग्रूपचा सत्कार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आलेल्या महापूरात मदतकार्यामध्ये सहभागी झालेल्या मालवण येथील मालवण आपत्कालिन ग्रुपचा यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्यांमध्ये दामोदर तोडणकर, सचिन गोवेकर, अझीम मुजावर, वैभव खोबरेकर, सुजित मोंडकर, चैतन्य मुळेकर, तुषार मराळ, उमेश ढाके, निलेश पुराळकर, दिनेश तोडणकर, प्रथमेश आढाव, महेश हर्णेकर, ओमकार केळूसकर, प्रशांत रसाळ, देवेंग्र मराळ आणि अक्षय मराळ यांचा समावेश आहे. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'