"खतसाठ्यात तफावत आढळल्यास खतविक्रेत्यांवर कडक कारवाईचे करण्याचे कृषि आयुक्त यांचे आदेश"
सिंधुदुर्गनगरी दिनांक 8 (जिमाका):- राज्यातील कृषी केंद्र चालकांनी त्यांच्याकडील खतविक्रीनंतरचा शिल्लक साठा आणि पॉस मशिनमधील साठा यांचा दररोज ताळमेळ असणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या तपासणीमध्ये त्यामध्ये तफावत आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी खत विक्रेत्यांच्या संयुक्त बैठकीत दिला आहे.
कृषी आयुक्तालयात कृषी आयुक्त मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टीसाईड, सीड डिलर्स असोसिएशनच्या (माफदा) शिष्टमंडळाबरोबर झाली. या वेळी येत्या दोन दिवसांत राज्यभर कृषी विभागाकडून खतांची धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, कोणतीही सबब चालणार नाही. दोषीवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत कृषी आयुक्तांनी दिले आहेत.
राज्यात खतसाठा अधिक असताना प्रत्यक्षात खते उपलब्धता का होत नाहीत? लोकप्रतिनिधींमार्फत कृषी विभागाकडे विचारणा केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कडक कारवाई करण्याचे संकेत बैठकीत दिले आहेत. खते विक्री झाल्यानंतर पॉस मशिनमधून लगेच साठा कमी करणे गरजेचे आहे. दुकानात गर्दा आहे, अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने खत विक्री कमी करण्याचे राहून गेले, अशा सबबी खपवून न घेणेबाबत कृषी आयुक्तांनी सूचित केलेले आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व खत विक्रेत्यांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या रासायनिक खतांचा एकूण 2452 मेट्रिक टनाइतका खत साठा उपलब्ध आहे. त्यापैकी 810 मेट्रिक टन युरियाचा साठा शिल्लक आहे.
केंद्र सरकारकडे युरिया व अन्य खतांची मागणी करायची झाल्यास पॉस मशिनमध्ये अधिक साठा दिसत असल्याने जिल्ह्याला मंजूर केलेल्या खतपुरवठ्यानुसार नवीन खते मिळण्यास अडचणी येतात, त्यामुळे अद्ययावत खतसाठा नोंद ठेवण्याची जबाबदारी कृषी केंद्र चालकांची आहे. त्यामुळे सर्व खत विक्री केंद्रांनी त्यांच्या पांस मशीनवरील खतसाठा आणि प्रत्यक्ष गोडावून मधील शिल्लक साठा यांचा ताळमेळ वेळच्यावेळी अद्ययावत करावयाचा आहे. जर विक्रेत्यांच्या पॉस मशीनवरील खत साठा प्रत्यक्ष शिल्लक असेलल्या खतसाठ्याशी जुळत नसेल तर अशा विकेत्यांविरुद्ध खत नियंत्रण आदेश 1985 व अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे.
०००००
Comments
Post a Comment