जागतिक अवयवदान दिन श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी येथे संपन्न
सिंधुदुर्गनगरी दिनांक 14 (जिमाका) :- मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, यांच्या वतीने श्री.पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा करण्यांत आला. या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अवयवदानाचे महत्व पटवून देण्यांत आले आणि अवयवदान करण्याची शपथही देण्यांत आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश ढेले व समाजसेवा अधिक्षक सुनिल कुंडगिर उपस्थित होते. श्री. ढेले यांनी विद्यार्थ्यांना अवयवदानाच्या सामाजिक आणि वैद्यकीय महत्वाविषयी सविस्तर माहिती दिली. अनेक गरजू रुग्णांना अवयवदान केल्यामुळे कसे नवजीवन मिळू शकते हे त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच सुनिल कुंडगिर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाद्वारे गरजू रुग्णांना कशा प्रकारे मदत केली जाते याबद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील रक्तकेंद्र आणि रक्त विघटन विभागामार्फत नितीन तुरनर यांनी रक्तदानाचे महत्व आणि फायदे यावर प्रकाश टाकला. नियमित रक्तदान केल्यांने आरोग्याला होणारे फायदे स्पष्ट करुन विद्यार्थ्यांना नियमितपणे रक्तदान करण्यांचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अवयवदान करण्याची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमामुळे विदयार्थ्यांमध्ये अवयवदान आणि रक्तदान या दोन्ही महत्वाच्या सामाजिक कार्याविषयी जागरुकता वाढण्यास मदत झाली. या कार्यक्रमासाठी श्री.पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.युवराज पांढरे, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यी, विद्यार्थीनी उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment