राष्ट्रीय लोक अदालतीचे 13 सप्टेंबर रोजी आयोजन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 11 (जिमाका) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली आहे.
जिल्ह्यतील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमून घेणेबाबत पक्षकरांना आवाहन करण्यात येत आहे.
तडजोड होऊ शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी दि. 13 सप्टेंबर 2025 च्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयाची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहे. असे संबंधित अधिक्षक अथवा लिपीक तसेच संबंधित वकिल यांना कळवावे.
लोक अदातीत तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, शुल्लक वादाचे पर्यावसन कायमस्वरुपी वादात होणार नाही. वैराने वैर वाढतच राहते असे होऊ नये, यासाठी सामंजस्य घडवावे हाच लोक अदालतीचा हेतू आहे. शिवाय लोक अदालतीतील निकालाविरुध्द अपिल होत नाही, वेळ व पैशांची बचत होते.
या लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी, कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे इ. प्रकरणे ठेवावयाची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे, यांनी केले आहे.
०००००००
Comments
Post a Comment