उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.२३ (जि.मा.का): डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन २०२४-२५ करीता जिल्ह्यातील नोंदणीकृत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी तसेच ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांनी तीन प्रतीत प्रस्ताव ३० सप्टेंबरपर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने "डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार" तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने "डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार" देण्यात येतो. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील "अ" "ब" "क" "ड" वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये १ लाख, रुपये ७५ हजार, रुपये ५० हजार, रुपये २५ हजार व सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये ५० हजार तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये २५ हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते. सन २०२४-२५ या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक ३० स्टेंबर २०२५ पर्यंत तीन प्रतीत जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असे आवाहन ग्रंथालय संचालनालय प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'