ई-पीक पाहणी 2025 : शेतकऱ्यांनी DCS मोबाईल अॅपच्या साहाय्याने स्वतः पीक नोंदणी करून घ्यावी
सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपच्या साहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वार ७/१२ उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होत आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून, रब्बी हंगाम 2024 पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली असल्याची माहिती डी.डी.ई.तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.
सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपचे व्हर्जन 4.0.0 अद्ययावत स्वरूपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अॅप अपडेट करून घ्यावे.
खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी 15 सप्टेंबर 2025 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तथापि, शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी. पीक पाहाणी दरम्यान काही अडचणी आल्यास, आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील.
तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी खरीप 2025 ची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करावी.
०००००
Comments
Post a Comment