उद्यमिता व्यवसाय विकास प्रशिक्षणास मोठा प्रतिसाद
सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का) : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि युथ एड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या राज्यव्यापी उद्यमिता यात्रे अंतर्गत व्यवसाय विकास प्रशिक्षणास दोन दिवसात 208 प्रशिक्षणार्थींनी लाभ घेतला.
उद्यमिता व्यवसाय विकास प्रशिक्षणाच्या काल पहिल्या दिवशी म्युथ्यी मटम यांनी प्रशिक्षणार्थींना व्यवसायाबाबत माहिती दिली. व्यवसाय कसा करायचा, व्यवसायातील अपयशाची कारणे याबाबत तसेच अमित तिखाडे यांनी व्यवसायाच्या कल्पना आणि व्यवसाय विकास नियोजन याविषयावर मार्गदर्शन केले. आजच्या दुसऱ्या दिवशी अग्रणी जिल्हा व्यवस्थापक शैलेश मेश्राम यांनी व्यवसाय कर्ज, त्याला लागणारी कागदपत्रे याबाबत तसेच अमित तिखाडे यांनी आर्थिक नियोजन याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
व्यवसाय विकास प्रशिक्षणाचा उद्या तिसरा आणि शेवटचा दिवस असून कर्ज पुरवठा, डिजिटल साक्षरता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि या तीन दिवसीय प्रशिक्षणाचा समारोपही करण्यात येणार आहे, अशी माहिती महात्मा गांधी नॅशनल फेलो शिवानी गरड यांनी दिली.
00000
Comments
Post a Comment