वाजवी दरात हळद कंदांसाठी डॉ.हेगडेवार प्रकल्पाशी संपर्क करा - प्र.कृषी विकास अधिकारी विरेश अंधारी
सिंधुदुर्गनगरी,दि. 31 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील जे शेतकरी हळदीच्या कंदाव्दारे लागवड करणार आहेत, अशा शेतकऱ्यांना वाजवी दरात कंद डॉ. हेगडेवार प्रकल्प माणगांव ता. कुडाळ यांच्याकडे उपलब्ध होणार आहेज. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी डॉ. हेगडेवार प्रकल्प, माणगांव येथे संपर्क साधावा. ज्या बचतगटानी हळद कंदांचे (बियाण्यांचे) उत्पादन केले आहे. बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे, अशा बचतगटांची माहीती तालुका समन्वयक उमेद अभियान कक्ष यांच्यामार्फत एकत्रित केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी हळद लागवड करण्यासाठी बियाणे कंद आवश्यक आहे. अशा इच्छुक शेतकऱ्यांनी आपली मागणी राज्यस्तर कृषी विभाग, कृषी विभाग जिल्हा परिषद, पंचायत समिती कृषी विभाग तसेच डॉ. हेगडेवार प्रकल्प माणगांव, भगिरथ प्रतिष्ठान झाराप, उमेद अभियान समन्वयक (तालुका कक्ष) यांच्याकडे नोंदवावे असे आवाहन प्र.कृषी विकास अधिकारी विरेश अंधारी यांनी केले.
जिल्ह्यामध्ये हळद लागवडीखाली सुमारे 245.30 हे. क्षेत्र असून या पिकासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये क्षेत्र विस्तारासाठी संधी आहेत. बदललेल्या हवामान परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामात भात पिकासोबतच मिश्रशेतीचा पर्याय करणे अनिवार्य करत आहे. हळद पीक हे नगदी पीक असून याच्या लागवडीस जिल्ह्यामधील हवामान पोषक असून शेतकऱ्यांना हळद लागवडीस प्रवृत्त करण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विशेष अभियान राबविण्याचे सूचित केले आहे.
त्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली या बैठकीस आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, प्र.कृषी विकास अधिकारी विरेश अंधारी, भगिरथ प्रतिष्ठान झारापचे डॉ. प्रसाद देवधर, हेगडेवार प्रकल्पाचे सुनिल उकिडवे तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी, अधिकारी कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी कृषी उपस्थित होते.
विशेष अभियान राबविण्यासाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासन, कृषी विभाग जिल्हा परिषद तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद हेगडेवार प्रकल्प, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
जिल्हा परिषद कृषि विभाग यांनी शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर मंजूर लाभार्थ्यांना हळद लागवडीसाठी रोपे वितरीत करण्यासाठीचे नियोजन केलेले आहे. रोपे डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापिठाचे फोंडाघाट येथील संशोधन केंद्रामार्फत दोन लाख वीस हजार रोपे उपलब्ध केली जाणार आहेत. या विविध माध्यमातून ग्रामस्तरावर व शेतकरी स्तरावर हळद बियाणे उपलब्धतेची माहिती संकलित करुन विस्तारित स्वरुपात हळद बियाणे बँक तयार केली जाणार आहे. जेणेकरुन ज्या शेतकऱ्यांना बियाणे आवश्यक आहे. त्या शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेल्या हळद बियाण्यांची माहिती विस्तारित हळद बियाणे बँकेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत.
00000
Comments
Post a Comment