विमुक्त जाती,भटक्या जमाती प्रवगंसाठी कन्यादान योजना -सहायक आयुक्त दीपक घाटे
सिंधुदुर्गनगरी,दि.23 (जि.मा.का) विमुक्त जाती, भटक्या जमाती धनगर व वंजारीसह इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामुहीक सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना २० हजार रुपये अनुदान देणेबाबतची कन्यादान योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी व संस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होवून विवाह करणाऱ्या दांपत्यांना वस्तू स्वरुपात २० हजार रुपये इतके अनुदान व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रती जोडप्यामागे ४ हजार रुपये इतके प्रोत्साहनात्मक अनुदान खालील निकषाप्रमाणे देण्यात येते. सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीय दांपत्यांना वस्तुस्वरुपात देण्यात येणाऱ्या अनुदान २० हजार रुपये वधुचे वडील,आई किंवा पालकांच्या अधोरेखित धनादेशाव्दारे लग्नाच्या दिवशी देण्यात येते. सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या पात्र स्वयंसेवी संस्थांना प्रती जोडप्यामागे ४ हजार प्रोत्साहनत्मक अनुदान देण्यात येते. यासाठी तीन महिन्याच्या आत विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. विवाह नोंदणी झाल्यानंतर रक्कम अधोरेखित धनादेशाव्दारे देण्यात येईल. सामुदायिक विवाह सोहळा करिता किमान १० जोडपी असणे आवश्यक राहील. योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी आहे. तथापि विधवा महिलेस दुसऱ्या लग्नाकरिता सुध्दा अनुज्ञेय राहील. स्वयंसेवी संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असली पाहीजे. अर्ज सादर करताना सदरहून नोंदणी प्रभावी असली पाहीजे. त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्था यांचेविरुध्द कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविलेला किंवा न्यायालयीन प्रकरण नसले पाहीजे.
या योजनेचा लाभ अधिकाधिक स्वयंसेवी संस्थानी व विवाहोत्सुक दांपत्यांनी लाभ घेण्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी या कार्यालयशी संपर्क साधावा.
0000
Comments
Post a Comment