काजु बी अनुदान योजना कार्यान्वीत
सिंधुदुर्गनगरी, : राज्यातील काजु उत्पादक शेतकऱ्यांना काजु बी साठी शासनाकडून वित्तिय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवून सन 2024 च्या काजु हंगामासाठी काजु उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजु उत्पादक शेतकऱ्यासाठी काजु बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली असुन या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य काजु मंडळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, असे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी दिली.
राज्यातील काजु उत्पादक या योजनेचे लाभार्थी असतील. त्यासाठी काजु उत्पादक शेतकऱ्यांच्या 7/ 12 वर काजु लागवडीखालील क्षेत्र / झाडांची नोंद असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षम काजुच्या झाडांची संख्या व त्यापासून प्राप्त काजु बी उत्पादन हे संबंधीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीकडील नोंदणीकृत परवानाधारक काजू व्यापारी, नोंदणीकृत सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ व नोंदणीकृत काजू प्रक्रियादार यांना काजु बी ची विक्री केलेली असणे आवश्यक आहे. काजु उत्पादक शेतकऱ्याने विक्री केलेल्या काजुच्या विक्री पावतीवर उपरोक्त नमूद नोंदणीकृत खरेदीदाराचा जीएसटी क्रमांक, शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता असणे आवश्यक आहे.
या योजनेच्या लाभासाठी काजु उत्पादक शेतकऱ्यांनी काजु बी विक्री पावती, 7/12 उतारा, आधार संलग्नित बचत बँक खात्याचा क्रमांकासह तपशील, कृषि विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र इ. तपशीलासह अर्ज महाराष्ट्र राज्य काजु मंडळाकडे दि. 31 ऑगस्ट 2024 पुर्वी सादर करावेत. कोकणातील व कोल्हापूर जिल्ह्यामधील संबंधित काजु उत्त्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काजु मंडळाच्या मुख्य/विभागीय कार्यालर्याकडे व अन्य भागातील काजु उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे सादर करुन अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन संजय कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजु मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment