सिंधुदुर्ग जिल्हयात 27 जुलैपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का) : राज्यातील सद्याच्या राजकीय परिस्थितीचे पडसात जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून अचानकपणे मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको सारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व 37 (3) नुसार दिनांक 13 जूलै 2022 रोजी रात्री 12 वाजलेपासून ते दिनांक 27 जुलै 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याचे संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे. या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यांस मनाई आहे. कलम 37 (1) Ø शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. Ø अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. Ø दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे. Ø व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.) Ø सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे. Ø सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे. कलम 37(3) Ø सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे. Ø हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही . वरील कालावधीतील मिरवणूकांना परवानगी देण्यांचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'