कोविड 19 प्रादुर्भावामुळे विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी तालुकास्तरावर एकाच दिवशी शिबीर - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी,दि.14 (जि.मा.का.) - कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे विधवा झालेल्या जिल्ह्यातील महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी, सर्व तहसिलदारांनी तालुकास्तरावर एकाच दिवशी शिबीराचे आयोजन करावे. कोणत्याही शासकीय लाभापासून विधवा महिला वंचित राहता कामा नयेत, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले . कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे विधवा झालेल्या महिलांचे पुनर्वसन करण्याच्या द्ष्टीने व त्यांचे न्याय हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कृती दल समितीची बैठक आज झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, महिला आर्थिक विकास महामंडळाचे नितीन काळे, प्रभारी अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकेश मेश्राम, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव वकील दीपक मालटकर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वकील संजय तायशेटे उपस्थित होते. तसेच सर्व तहसिलदार, बाल विकास प्रकल्प अधिकारी दूरदृष्यप्रणालीव्दारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, सर्व तहसिलदारांनी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडून मिळालेली माहिती पुन्हा एकदा तपासावी. तालुकास्तरावर सर्व यंत्रणांची बैठक घेवून त्याबाबत आढावा घ्यावा.शासनाच्या किती योजना, किती महिलाना मिळाल्या, याची खातरजमा करावी. या महिलांना आणखी काही लाभ देता येतील का ? त्यासाठी गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करावी. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळाबाह्य मुलांची माहिती गोळा करावी. पात्रतेनुसार महिलांना प्रशिक्षणाचा लाभ देण्यात यावा. ज्या महिलांना नवीन व्यवसाय सुरू करावयाचा आहे, त्यांना अग्रणी बँक व अन्य बँकांकडून प्राध्यान्यांने अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे. शासनाच्या सर्वच योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी, तालुकास्तरावर एकाच दिवशी शिबीराचे आयोजन करावे. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड म्हणाले, ज्या विधवा महिलांना लाभ मिळालेला नाही. अशा महिलांना पत्र पाठवून.आवश्यक त्या कागदपत्रासोबत शिबीरास उपस्थित राहण्याबाबत कळवावे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'