ई- लायब्ररी व स्पर्धा परीक्षा विभागाचा लोकार्पण सोहळा विद्यार्थी व वाचकांनी ई-लायब्ररीचा लाभ घ्यावा - पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जि.मा.का.): पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या ज्ञानात भर पडते. वाचनाने एक संस्कृत व्यक्ती घडू शकतो. त्यामुळे आपल्या जिवनात पुस्तकाचं फार महत्व आहे. या करिता ई- लायब्ररी चा लाभ विद्यार्थी व वाचकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. जिल्ह्यातील शासकीय सार्वजनिक ग्रंथालयात तयार करण्यात आलेल्या ई- लायब्ररी व स्पर्धा परीक्षा विभागाचा लोकार्पण सोहळा रा.ब. अनंत शिवाजी देसाई (टोपीवाले) वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय पानबाजार येथे संपन्न झाला. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार राजन तेली, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, प्रभाकर सावंत, अरविंद शिरसाट, डॉ. पाटणकर, अस्मिता बांदेकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, ग्रंथालय व वाचनालयांना अनुदान वेळेत कसे मिळेल यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच पूर्वीचे ग्रंथालय व आताच्या ग्रंथालयाच्या परिस्थितीत आमुलाग्र बदल झाले आहेत. विद्यार्थी वाचन जास्तीत जास्त कसे करतील यासाठी आपण विशेष प्रयत्न केले पाहीजे. ग्रंथालय हे स्थापनेपासून अविरतपणे ज्ञान देण्याचे काम करीत आहे. असे सांगून पालकमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाच्या माध्यमातून जगाला आणि भारतातील प्रत्येकाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे छोट्यातला छोटा घटक व उच्च वर्ग यांना डिजिटल इंडियाच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, प्रत्येक मुलांचे स्वप्न असते की आपली प्रशासकीय सेवेत निवड व्हावी, प्रत्येक मुलांमध्ये कौशल्य असते ते ओळखण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला पाहीजे. अस्तित्वात असणाऱ्या ग्रंथालयाचा वापर करुन अधिक मूलभुत सुविधा लोकापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. टी.व्ही व इंटरनेटच्या वापरामुळे सध्या मुले ही वाचनापासून दूर गेली आहे. वाचनाची आवड निर्माण व्हावी, व ते पुन्हा वाचनाकडे वळविण्यासाठी ' रीड महाराष्ट्र' हा उपक्रम लवकरच महाराष्ट्रात लाँच केला जाणार आहे. असे ही ते म्हणाले. प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी सांगितले की, नाविण्यपूर्ण योजना सन 2022-23 या अंतर्गत जिल्हा नियोजन समिती योजनेतून ई- ग्रंथालयासाठी रुपये 2 कोटी उपलब्ध झालेला होता. जिल्ह्यातील 8 शासकीय सार्वजनिक ग्रंथालयाना ई- ग्रंथालय तयार करण्यात आलेले आहे. या ई- ग्रंथालय मार्फत करिअर मार्गदर्शन, लाईव्ह लेक्चर, रिकोर्डींग लेक्चर, पीडीएफ नोट्स, ई- पेपर, ई-मासिक, तज्ञ लोकांचे मार्गदर्शन, ऑडिओ बुक, टेस्ट सिरीस, चालु घडामोडी ची माहिती देण्यात येणार आहे. यावेळी विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमांची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. आभार प्रदर्शन अरविंद शिरसाट यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, वाचक व नागरिक उपस्थित होते. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'