'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी' अभियानाचा दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा
सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.) : जिल्ह्यात 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी' हे अभियान राबविण्यात येणार आहे. तरी सर्व अपंग बांधवांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी " हे अभियान प्रत्येक जिल्हयात राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या अभियानात विविध बाबींच्या संदर्भात धोरण व अंमलबजावणी- करण्या करीता विधानसभा सदस्य ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे याअभियान जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात यावे. तसेच जिल्हास्तरीय समितीची रचना देखील स्पष्ट करण्यात आलेली आहे.
या अभियानाची जिल्हा स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सर्वसाधारण प्रमाणित कार्यपद्धती SOP (Standerd operating procedure) देण्यात आलेली आहे. यामध्ये अभियानाची पूर्वतयारी, विभाग प्रमुखांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, कार्यक्रमाचे स्वरुप अभियाना नंतरची कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तसेच प्रपत्र "अ" मध्ये प्रस्तावित स्टॉलची यादी व प्रपत्र "ब" मध्ये जिल्ह्यात अभियान राबण्याचा दिनांक नमुद केलेला आहे.
जिल्ह्यात दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेक जण विभागीय स्तरावर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे शासनानेच दिव्यांगांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी हे अभियान प्रत्येक जिल्हयात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनच अशा दिव्यांग बांधवांच्या दारी गेले तर खऱ्या अर्थाने दिव्यांगाची सेवा होऊ शकते. याअभियानात जिल्हा स्तरावर शासनाचे सर्व विभागाचे अधिकारी, सर्व शासकिय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगाच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करता येईल. म्हणुन " दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" हे अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व दिव्यांग बांधवांनी त्यांना आवश्यक बाबींची मागणी त्वरीत संबंधित विभागाकडे करुन त्याची प्रत संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयकडे द्यावी. जणेकरुन त्याचा पाठपुरावा करुन संबंधित विभागाकडून या लाभ दि.18/10/2023 रोजी देण्याबाबत नियोजन करता येईल. तरी जिल्हयातील सर्व अपंग बांधवांनी सदर अभियानाचा लाभ करून घेण्याचे अहवान समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद, सिधुदुर्ग यांचे तर्फे करण्यात येत आहे.
0000000
Comments
Post a Comment