शिवमाऊली ॲग्रोची फ्लेव्हर्ड काजू उत्पादनात यशस्वी वाटचाल...

नोकरीच्या पाठीमागे लागून आपला गाव सोडून स्थलांतरीत होणाऱ्या युवकांची संख्या आता रोडावत चालली आहे. नोकरी करण्यापेक्षा आपल्या गावातच आपण व्यवसाय सुरु करुन इतरांना रोजगार देवूया... या विचारातून वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड येथील किशोर ऊर्फ विश्राम सीताराम गावडे या युवकाने शिवमाऊली ॲग्रोच्या माध्यमातून काजू प्रक्रिया उद्योग उभारला आहे. विविध फ्लेव्हर्डचे काजू उत्पादन करत त्याने यशस्वी वाटचाल सुरु ठेवली आहे. अवघ्या एक लाखाच्या भांडवलात 2012 पासून छोट्या प्रमाणात काजू प्रक्रिया उद्योगाची सुरुवात केली. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गंत 1 कोटी 70 लाख 45 हजार रुपयांच्या प्रकल्प खर्चाचा प्रस्ताव विस्तारीकरणासाठी सादर केला. चालू वर्षी 20 व 20 लाखाचे दोन हप्ते मंजूर करण्यात आले आहेत. ग्राहकांची चवदार मागणी आणि बदलत्या बाजाराचा कानोसा घेत विश्रामने ग्रीन चिली, रेड चिली, गार्लीक, शेजवान, ब्लॅक पेपर, पाणीपुरी, टोमॅटो, रोस्टेड ड्रम, सॉल्टेड पकोडा अशा फ्लेव्हर्डचे प्रक्रिया काजू उत्पादन सुरु केले आहे. हे विविध प्रकार ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. हे रोजच्या मागणीवरुन लक्षात येत आहेत. गोवा,मुंबई आणि स्थानिक बाजार पेठेत याची विक्री होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. केवळ 12 वी शिक्षण घेतलेला विश्राम अविश्रांतपणे आपल्या फॅक्टरीत दररोज बाराशे किलो काजूवर प्रक्रिया करत आहे. काजूची टरफले तेल काढण्यासाठी कारखान्याला विकतो. यासाठी लागणारा काजू थेट शेतकऱ्यांकडून व काही प्रमाणात व्यापाऱ्यांकडून विकत घेतो. या त्याच्या उद्योगात आई सत्यवती, पत्नी दीपाली,वडील सीताराम व काकांचा मुलगा नितीन मदत करत असतात. हे विश्राम आर्वजून सांगतो. संपर्क क्र. 9421268399 मे.जी. एच. कॅश्यूच्या माध्यमातून काजू प्रक्रिया उद्योग श्रीमती गायत्री गुरुप्रसाद गोलम यांनी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गंत 1 कोटी 18 लाख 40 हजार रुपये खर्चाचा प्रकल्प सादर केला. यासाठी अनुदानाचा पहिला व दुसरा 12 लाखाचा हप्ता मंजूर करण्यात आला आहे. कुडाळ येथील एम.आय.डीसी मध्ये मे.जी.एच. कॅश्यूच्या माध्यमातून त्या दिवसाला पाचशे किलो काजू प्रक्रिया करतात. यामाध्यमातून 30 कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.मुंबई, पुणे, लोणावळा, नागपूर, राजस्थान, सुरत येथील बाजारात विक्री करतात. उर्वरीत टरफल तेलासाठी विक्री करतातत. कृषी विभागाच्या माध्यमातून अपेक्षापेक्षा लवकर अनुदान मंजूर झाल्याने त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले. संपर्क क्र. 9594545160 जिल्हा माहिती कार्यालय,सिंधुदुर्ग 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'