महिला व बाल विकास विभागाची चाईल्ड हेल्पलाईन सेवा बारा महिने 24 तास कार्यरत

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का.) : महिला व बाल विकास मंत्रालय नवी दिल्ली अंतर्गत मिशन वात्सल्य योजना मार्गदर्शिका 2022 नुसार बालकांसाठी जिल्ह्यामध्ये जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या अंतर्गत बाल संरक्षण कक्षाशी संलग्न चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 बारा महिने, चोवीस तास कार्यरत असणारी इमर्जन्सी सेवा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली. ही सेवा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुला- मुलींकरिता चाईल्ड हेल्पलाईन 1098 (CHL) 24 तास कार्यरत असणारी मोफत सेवा आहे. चाईल्ड हेल्पलाईन ही 24 तास चालू असणारी मुलांसाठी कार्य करणारी भारतातील पहिली इमर्जन्सी सेवा आहे. चाईल्ड हेल्पलाईन इमर्जन्सी सेवा जून 1996 मध्ये प्रायोगिक प्रकल्प म्हणून प्रा. जेरु बिलिमोरिया,टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई आणि महिला व बाल कल्याण विभाग यांच्यामार्फत सुरु करण्यात आली. त्यानंतर भारत सरकारने 1998-99 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत चाइल्ड लाइन 1098 सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध करुन दिली. सद्यस्थितीत महिला व बाल विकास विभाग अंतर्गत संपूर्ण देशात सदरची सेवा देण्यात येत आहे. काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके कोण ? रस्त्यावर एकटे राहणारी मुले. असंघटित आणि संघटित क्षेत्रातील बालकामगार. कौटुंबिक, शाळा किंवा संस्थांमध्ये शारीरिक, लैंगिक, भावनिक शोषणामुळे प्रभावित झालेली मुले. ज्या मुलांना भावनिक आधार आणि मार्गदर्शनाची गरज असते. देह व्यापाराला बळी पडणारी मुले. मानवी तस्करीचे बळी पडलेली बालक. अवैधरित्या दत्तक बालक. हरवलेली मुले. मादक पदार्थांच्या गैरवापराला बळी पडलेली मुले. दिव्यांग मुले. विधीसंघर्षग्रस्त बालक. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये सापडलेली मुले. एकपालक व अनाथ बालक. बालविवाह पिडित बालक. वरीलप्रमाणे चाईल्ड हेल्पलाईन सेवा क्रमांक 1098 या चोवीस तास कार्यरत असणाऱ्या टोल फ्री क्रमांकावर पिडित बालक अथवा इतर कोणीही व्यक्ती कॉल करुन माहिती देऊ शकते, माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येते. तरी काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना तत्काळ मदत मिळण्याकरिता चाईल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. रसाळ यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'