पुल आणि रस्त्यांच्या माध्यमातून परिसराचा विकास होणार -पालकमंत्री रविंद्र चव्हाण
अणाव घाटचेपेड ते मांजरेकरवाडी ते ओरोस पूल तसेच मठ, कुडाळ,पणदूर,घोटगे रस्त्यांचे लोकार्पण
सिंधुदुर्गनगरी, दि.04 (जि.मा.का.) : पुलांच्या माध्यमातून फक्त दोन गावे जोडली जात नाहीत तर त्या पूर्ण परिसराच्या विकासात पुलाचे योगदान महत्वाचे असते. अणाव घाटचेपेड ते ओरोस या पूलाचे काम नाबार्ड 23 ह्या योजनेखाली मंजूर झालेले आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने ठरलेल्या प्रमाणात निधी देणे आवश्यक असते. त्या नियमानुसार शासनाने निधी उपलब्ध करुन दिल्याने हा पूल पूर्ण झाला आहे. तसेच मठ, कुडाळ, पणदूर घोटगे रस्त्यावरील उंच पातळीचा पूल बांधल्याने अनेक गावे जोडली जाणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.
कुडाळ तालुक्यातील अणाव घाटचेपेड ते मांजरेकरवाडी ते ओरोस पुलाचे तसेच मठ, कुडाळ, पणदुर घोटगे रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, आज दोन्ही विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात आर्वजून सांगावे असे वाटते की, हे दोन्ही विकास कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत पूर्ण केल्याने सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. विशेष म्हणजे घाटचेपेड या पुलाची उंची एवढी मोठी आहे की कितीही मोठा पाऊस आला तरी ह्या पुलावरची वाहतूक बंद पडणार नाही असे सांगून पालकमंत्री म्हणाले, केंद्रातल्या योजनांचा लाभ जनतेला मिळावा यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. विविध कल्याणकारी योजना राबवून शासन जनतेचा विकास करत आहे. शासन प्रत्येक सणाला नागरिकाला ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येत असल्याने गरजूंना मोठा दिलासा मिळत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी माजी खासदार निलेश राणे, प्रभाकर सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते या विकास कामांसाठी जमीन दिलेल्या नागरिकांचा सत्कार देखील करण्यात आला.
00000
Comments
Post a Comment