'लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण' परिसंवादाचे आयोजन लोकशाही सशक्त करण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्वपूर्ण -श्रीकांत देशपांडे
सिंधुदुर्गनगरी, दि.5 (जि.मा.का.) : लोकशाही अधिक बळकट होणे आवश्यक असून ती रुजविण्यामध्ये कुटूंबसंस्था आणि शाळा या दोन्ही घटकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. लोकशाही जागरुक ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. लोकशाही प्रक्रीयेत तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होणे आवश्यक असून लोकशाही हा जीवनमार्ग व्हायचा असेल तर ती समाजाच्या विभिन्न क्षेत्रात पोहचली पाहिजे. अगदी आपल्या कुटुंबात देखील. लोकशाही सक्षमीकरणाच्या या प्रक्रियेत तरुणांनी सजग होऊन मोठ्या प्रमाणात भाग घेतला पाहिजे असे आवाहन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशापांडे यांनी केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून 'लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण' या विषयावर भोंसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या परिसंवादामध्ये भाषा अभ्यासक डॉ. प्रकाश परब, अभिनेत्री संपदा जोगळेकर, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, छायाचित्रकार इंद्रजीत खांबे, प्रसाद गावडे, जुइली पांगम, प्राचार्य शमशुद्दीन आत्तार आणि तसेच डॉ. दीपक पवार सहभागी झाले होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपसचिव श्री पारकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र शासन, भोसले नॉलेज सिटी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
श्री देशपांडे म्हणाले, लोकशाही जपायची असेल तर ती आधी आपल्या जगण्यात रुजवायला हवी. घटनेत उल्लेख केलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या आधारे ती जगण्यात आणता येईल. त्या आधी तरुण पिढीनं आपलं नाव मतदारयादीत नोंदवायला हवं आणि मतदानही करायला हवं. समाजामध्ये मतदानाविषयी असणारी उदासिनता देखील कमी करणे आवश्यक असून यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहभाग घेणे आवश्यक असल्याचेही श्री देशपांडे म्हणाले.
विद्यार्थी आणि शिक्षक संवाद वाढवणे आवश्यक - शमशुद्दीन आत्तार
सध्याची शिक्षण व्यवस्था एकेरी आहे. शिक्षक शिकवत राहतो आणि विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. परंतु ही पध्दती बदलणे आवश्यक असून शिकवताना विद्यार्थ्यांच्या मतांना देखील महत्व देणे आवश्यक आहे. त्यांच्यातील नेतृत्व गुणाला वाव मिळणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे त्यांच्यातील श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव नष्ट होणे आवश्यक असल्याचे प्राचार्य शमशुद्दीन आत्तार म्हणाले.
भाषा संवर्धन होणे ही काळाची गरज- प्रकाश परब
भाषा हे जग ओळखण्याचे माध्यम आहे. जेवढ्या भाषा अवगत तेवढे आकलनाचे दृष्टीकोन वेगवेगळे आहेत यावरुन भाषेचे महत्व लक्षात येते. समाज माध्यमांमध्ये आपले विचार मांडताना नेहमी सजग राहणे आवश्यक आहे. भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भाषेपासून दूर गेल्यास विचार शक्ती खुंटते असेही मत भाषा अभ्यासक प्रकाश परब यांनी मांडले.
श्रमप्रतिष्ठेला महत्व प्राप्त होणे आवश्यक- वंदना करंबळेकर
सध्याच्या युगात श्रमप्रतिष्ठेला कमी महत्व असल्याचे दिसत आहे. कोणतेही काम हे लहान मोठं नाही हा विचार समाजात रुजवणे आवश्यक आहे. कामाची प्रतिष्ठा ठरवत ते करण्यापेक्षा आपण केलेल काम प्रतिष्ठित व्हावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर यांनी सांगितले.
आपण स्वत: करत असलेली कृती म्हणजे लोकशिक्षण - संपदा जोगळेकर
आपण करत असलेल्या कृती कडे सर्वांचे लक्ष असते. त्यामुळे सर्वांनी दैनंदिन जीवनात विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. मी स्वत: जेव्हा समाजात वावरते तेव्हा कृती करताना खूप विचार करते कारण अभिनेत्री म्हणून साहजिकच माझ्या कृतीचे अनुकरण केल्या जाते. मी भाजी घेतल्यावर प्लास्टीकची पिशवी अजिबात घेत नाही तर मी दुकानदाराला माझ्याकडच्या कापडी पिशवीत भाजी देण्याचे सांगते. कारण मला माहिती आहे माझ्या या कृतीचे एखाद्या भगीनीने अनुकरण केले तरी मला समाधान आहे. म्हणूनच स्वत: करत असलेली कृती म्हणजे लोकशिक्षण असल्याचे मत अभिनेत्री संपदा जोगळेकर यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील जीवन हेच उत्तम जीवन - प्रसाद गावडे
निश्चित आणि सीमित उपजीविका सांभाळत जगत राहणे हेच ग्रामीण भागातील जीवनाचे गुपित आहे. खेड्यात लोकसंख्या विरळ असल्याने भौतिक सुविधा विकसित करणे शक्त होत नाही परंतु शांत आणि संयमित जीवनाची अपेक्षा खेड्यातील जीवनात करु शकतो.
शेती, पशुपालन, आणि लघु उद्योग करीत खेड्यातील सर्व लोक आपापली उपजीविका चालवत असतात. कसदार जमीन, स्वच्छ पर्यावरण, हवा , झाडे आणि पशुपक्षी अशा घटकांच्या नियमित संपर्कात असल्याने खेड्यातील व्यक्ती निसर्गाशी जोडलेला असतो असे ग्रामीण भागातील अभ्यासक प्रसाद गावडे म्हणाले.
करिअर निवडताना छंदाचा विचार करा- इंद्रजित खांबे
करिअर निवडताना काळजीपूर्वक निवडणे आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण निवडलेले करिअर आपल्या छंदाशी निगडीत नसल्याने निराशा होते त्यामुळे नेहमी करिअर निवडताना छंदाचा विचार करुनच करिअरची निवड करावी असे छायाचित्रकार इंद्रजित खांबे म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोस्टर्स व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच भित्तिपत्रक सादरीकरण स्पर्धा पथनाट्य सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले होते. नव मतदारांना त्यांचे नांव मतदार यादीत समाविष्ट करता यावे यासाठी भोसले नॉलेज सिटी परिसरात एक स्टॉल उभारण्यात आला होता. त्यामध्ये सर्व प्रकारचे फॉर्म्स उपलब्ध करुन देण्यात आले होते या स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
००००
Comments
Post a Comment