आरोग्यम् धनसंपदा हा सुविचार न राहता अंमल आवश्यक -आहार सल्लागार आनंद कुलकर्णी
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) : जगण्यासाठी पैसा लागतो पण पैसा नसेल तर जगता येत नाही असे अजिबात नाही. पैसा मिळविण्याच्या नादात आरोग्याचा किती बळी देतोय याचा हिशोब आपण कधी मांडणार आहोत की नाही? आरोग्यम् धनसंपदा हा केवळ सुविचार न राहता त्याचा खरा अंमल आवश्यक आहे, असे मौलीक मार्गदर्शन निसर्गोपचार, योग आहार शास्त्र सल्लागार आनंद कुलकर्णी यांनी केले.
महिला व बाल विकास विभाग,महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने 48 वा वर्धापन दिन सावंतवाडी येथील, काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहात झाला. यावेळी आहार, योगाचे महत्त्व व ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर श्री. कुलकर्णी मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्ज्वलाने झाली. यावेळी नाबार्ड जिल्हा प्रबंधक अजय थुटे, जिल्हा उद्योग केंद्रचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, महिला व बाल विकास कार्यालयाचे संजय पवार, लुपिन फौंडेशनचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत म्हापणकर, आयसीआयसीआय बँक प्रतिनिधी संकेत पार्सेकर, कृषी पर्यवेक्षक एस. एम. पाटील, महिला व बालक विशेष सहाय्यता कक्षाच्या अर्पिता वाटवे, कणकवली हिरकणी सीएमआरसी च्या अध्यक्ष उद्यमती देसाई, माहेर सीएमआरसी अध्यक्ष नम्रता झारापकर उपस्थित होते.
श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले, आरोग्यचा बळी देवून मिळविलेला पैसा तुमचा कधीच नाही. तो ते डॉक्टरांचे धन होईल. भारतीय संस्कृती उद्दात्त आहे. गुरुकुल संस्कृतीमध्ये 14 विद्या आणि 65 कला शिकविल्या जातात. आयुर्वेद ही जीवन पध्दती आहे. कसं जगलं पाहिजे, हे आयुर्वेद शिकविते. त्यातीलच एक भाग म्हणजे आहारशास्त्र होय. ज्या भागात राहतो, त्याभागात जे पिकतं तेच खाल्लं पाहिजे, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगल राहील. आपण मोहाला दार उघडलं, आणि रोगाला बळी पडलो. आपणाला आरोग्य हेव असेल तर स्वत:ला अंमल होण्याची गरज आहे.
मुख्याधिकारी श्री. जावडेकर म्हणाले, सध्याचे वर्ष हे भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याबाबत पोषक तत्त्वांची चर्चा आणि प्रसार झाला पाहिजे. त्यादृष्टीने सर्वांनी विशेषत: महिला वर्गानी पुढाकार घ्यावा.जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते म्हणाले, गुणवत्तापुर्ण वाढीसाठी आयुष्यात सातत्यपुर्ण सराव महत्वाचा आहे. छोट्या व्यवसायातून मोठा फायदा होत असतो. केवळ ती करण्याची मनाची तयारी हवी. उद्योगाला नव्या पर्यायाची जोड दिली पाहिजे, काळानुरूप सातत्याने बदल स्वीकारायला हवेत तरचं स्पर्धेत टिकून राहतो.
यावेळी नाबार्डचे श्री. थुटे, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. दामले, कृषी पर्यवेक्षक अमोल पाटील आदींनी मार्गदर्शन केले. माविमचे जिल्हा समन्वय नितीन काळे यांनी प्रास्ताविक केले.
माविम प्रार्थना ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ या प्रेरणा गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माविमच्या लेखाधिकारी आशालता जमने, सिंन्धुकन्या सीएमआरसी मालवण कट्टाच्या अध्यक्ष प्रीती सावंत,अन्नपूर्णा सीएमआरसी देवगडच्या सचिव स्वप्नाली यादव, स्वाधार सीएमआरसी कुडाळच्या उपाध्यक्ष स्वाती मांजरेकर, सीएमआरसी व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी, उपजीविका सल्लागार व सीआरपी उपस्थित होते.
प्रत्येक तालुक्यातून तिरंगा थाळी स्पर्धाचे तीन नंबर काढण्यात आले होते. जिल्ह्यातूल 12 महिलांनी तिरंगा थाळी स्पर्धेत सहभाग घेतला यामधून 3 क्रमांक व 3 उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले व सहभागी सर्व महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व सीएमआरसी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.‘हम होंगे कामयाब’ या गीताने व उपस्थित सर्वांचे आभार मानून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
००००००
Comments
Post a Comment