"न्याय आपल्या दारी" संकल्पनेतून मोबाईल लोक अदालत व्हॅनचा 6 फेब्रुवारीला शुभारंभ - सचिव डी. बी. म्हालटकर
सिंधुदुर्गनगरी दि.02 (जि.मा.का): महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार दिनांक 6 फेब्रुवारी ते 4 मार्च 2023 या कालावधीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांच्यामार्फत "न्याय आपल्या दारी" संकल्पनेतून मोबाईल लोक अदालत व फिरते विधी सेवा केंद्र या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात मोबाईल व्हॅनद्वारे कायदेविषयक जनजागृती शिबिरे व मोबाईल लोक अदालती घेण्यात येणार असून, जिल्ह्यात कणकवली, वैभववाडी, सावंतवाडी, मालवण, देवगड, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ व ओरोस या ठिकाणी कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन शिबिरे व मोबाईल लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मोबाईल व्हॅनचा शुभारंभ दि. 6 फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायालय, येथून होणार आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. बी. म्हालटकर यांनी दिली आहे.
मोबाईल लोक अदालतीचे रानबांबुळी पिंगुळी, बांदा, वझरे, शिरोडा, कांदळगाव, जामसांडे, खारेपाटण व ग्रामन्यायालय वैभववाडी येथे घेण्यात येणार आहेत. मोबाईल व्हॅन लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत कायदेविषयक सेवांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मोबाईल व्हॅनद्वारे गावातील लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील अणाव, आकेरी, चराठा, इन्सूली, सासोली, परबवाडा, आरवली, वायंगणी, कोळंब, इळये, शिरगाव, शिवडाव, कोकिसरे व नरडवे या गावामध्ये वेगवेगळ्या विषयावर कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
तसेच दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत. तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत कायदेविषयक सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. म्हालटकर यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment